शिरूर : शिरूरमधील आंबळे येथे हरिनाम सप्ताहातील कीर्तन ऐकून घरी परतणाऱ्या चौघांना भरधाव अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलांसह वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. गुरुवारी रात्री न्हावरे-शिरूर रस्त्यावरील केसरी हॉटेलसमोर ही दुर्घटना घडली. धडक दिल्यानंतर जखमींच्या मदतीला न थांबता वाहनचालक वाहनासह पसार झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने आंबळे गावावर शोककळा पसरली आहे.
या अपघातात कौशल्या वसंत झेंडे (वय ६१), सोहम राजीव झेंडे (वय १३) आणि आरुषी दत्तात्रय झेंडे (वय ११, सर्व रा. आंबळे, ता. शिरूर) यांचा मृत्यू झाला. तर ज्योती राजीव झेंडे (वय ४२) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबळे येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहानिमित्त दररोज महाप्रसाद आणि कीर्तनाचे कार्यक्रम होत आहेत. गुरुवारी रात्री ज्योती झेंडे, त्यांच्या सासू कौशल्या झेंडे, मुलगा सोहम आणि शेजारी राहणाऱ्या चुलत जावेची मुलगी आरुषी हे चौघे कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशिरा ते न्हावरे-शिरूर रस्त्याच्या कडेने पायी घरी परतत होते.
आंबळे गावाजवळील केसरी हॉटेलसमोर न्हावरे बाजूकडून शिरूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने चौघांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चौघेही रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सोहम आणि आरुषी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कौशल्या आणि ज्योती झेंडे यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शिरूर येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले. कौशल्या झेंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्योती झेंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मृतांचे नातेवाईक संतोष अनिल झेंडे (वय ३६, रा. आंबळे) यांनी न्हावरे पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
