शिरूर : चौफुला ते शिरूर रस्त्यावर नलगेवस्ती जवळ ट्रकची मोटारीला धडक बसल्याने नऊ वर्षांच्या मुलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. शुक्रवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली.
पवन राजहंस काळे (वय ३४), त्यांची मुलगी आराध्या (वय ९ रा. निमोणे, ता. शिरूर) आणि त्यांचे मेव्हणे बाळासाहेब प्रकाश नागवडे (वय ३८ रा. बाबुराव नगर, शिरूर, मूळ रा. गुनवडी, जि. अहिल्यानगर) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. वंदना पवन काळे (वय ३०) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार ही निमोणे गावाच्या दिशेने जात असताना शिरूरकडून येणाऱ्या ट्रकची मोटारीला जोरदार धडक बसली. त्यामध्ये मोटारीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला. वंदना काळे या गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी संजय ज्ञानदेव काळे (रा. निमोणे) यांनी तक्रार दिली असून, ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नकाते तपास करत आहेत.

