शिरूर : शिरूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोडनदीवरील हत्तीडोह बंधाऱ्यात १० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असून, तालुक्यातील औद्योगिक वसाहतीस पाणीपुरवठा होत असणाऱ्या चिंचणी धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. शिरूर तालुक्यातील चार गावांमध्ये १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

शिरूर शहराची लोकसंख्या ५० हजारांहून अधिक आहे. शहराला घोडनदीवरील हत्तीडोह येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारातून पाणीपुरवठा केला जातो. या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता ५५ दशलक्ष घनमीटर आहे. ‘कुकडीतील पाणी हे शिरूरच्या घोडनदी पात्रातील हत्तीडोह बंधारात सोडण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिरूर शहरातील कूपनलिका दुरुस्त करण्यात आल्या आहेत. उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणे आवश्यक झाले आहे,’ असे मुख्याधिकारी प्रीतम पाटील आणि आदित्य बनकर यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई, हिवरे, केंदूर, पाबळ या चार गावांत मागील महिन्यापासून १२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पंचायत समितीकडे पाण्याच्या टँकरची मागणीसंदर्भातील प्रस्ताव आल्यानंतर मंजुरीसाठी तो प्रांत कार्यालयाकडे पाठवण्यात येत असल्याचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीस आणि श्रीगोंदा, काष्टी व न्हावरा या पाणीपुरवठा योजनेस चिंचणी येथील घोड धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यापूर्वी रब्बी व उन्हाळी पाण्याची आवर्तने देण्यात आली आहेत. सध्या धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव असल्याचे धरणाचे शाखा अभियंता वैभव काळे यांनी स्पष्ट केले.