शिरूर : शिरूर शहरात शनिवारी घडलेल्या एका घटनेने ‘माणुसकी संपली’ या समजुतीला छेद दिला. शहरातील निर्माण प्लाझा परिसरात एका गर्भवती महिलेची भर रस्त्यात प्रसूती झाली. स्थानिक महिला, डॉक्टर, नगरसेविका आणि नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आई आणि नवजात अर्भक सुरक्षित राहिले.

जोशीवाडी परिसरातील एक महिला प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर शिरूर ग्रामीण रुग्णालयाकडे पायी निघाली होती. निर्माण प्लाझाजवळ पोहोचताच वेदना तीव्र झाल्या आणि ती रस्त्यावरच बसली. या घटनेची माहिती मिळताच या परिसरातील महिला क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी पुढे आल्या. कोणी स्कार्फ, तर कुणी साड्यांच्या मदतीने आडोसा तयार करून तात्पुरती सुरक्षित जागा निर्माण केली. या वेळी रिक्षाचालक, मेडिकल स्टोअरमधील कर्मचारी आणि नागरिकांनीही मदतीचा हात पुढे केला.

दरम्यान, नगरसेविका डॉ. सुनीता पोटे आणि पूजा पोटावळे घटनास्थळी पोहोचल्या. प्रारंभी नवजात अर्भक रडत नसल्याने उपस्थितांमध्ये क्षणभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले; मात्र डॉ. पोटे यांनी प्रसंगावधान राखत प्राथमिक उपचार करून बाळाला रडायला लावले. त्यानंतर काही वेळापूर्वी तणावात असलेले वातावरण टाळ्यांच्या कडकडाटात बदलले. ‘निर्माण प्लाझावर झाला निर्माणचा जन्म’ अशी भावना व्यक्त करत उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.

त्यानंतर आई व बाळाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. पोटे यांनी दिली. ही घटना केवळ एका बालकाच्या जन्मापुरती मर्यादित न राहता, संकटकाळात समाज एकत्र येत असल्याचे आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे अधोरेखित करणारी ठरली.