शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांविरोधात आज (रविवार) पुण्यातील कोथरुड येथील कर्वे पुतळ्यासमोर शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या फोटोला शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तर, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सहा दिवसांपासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. यामुळे राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. एकनाथ शिदेंनी आपल्याकडे ४० पेक्षा जास्त आमदारांच पाठिंबा असल्याचा दावा केला आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं अशी मागणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत.

या पार्श्वभूमीवर काल शिवसेनेचे बंडखोर नेते आमदार तानाजी सावंत यांचं पुण्यातील बालाजीनगर येथील मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. तसेच, सदाशिव पेठेतील वैद्यकीय मदत कक्षावरील मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, मंगेश चिवटे यांच्या फोटोला शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे फासल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज सकाळी कोथरुडमधील कर्वे पुतळ्यासमोर शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे आणि शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या फोटोला शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तर यावेळी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरादर घोषणाबाजी देखील करण्यात आली.

हे सर्व आमदार महाराष्ट्रात येतील तेव्हा त्या सर्वांचं स्वागत कसं होतं पाहाचं –

शिवसेनचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले की, “आजपर्यंत शिवसेनेसोबत ज्यांनी गद्दारी केली आहे. त्या सर्वांची अवस्था काय झाली आहे. ते महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदारांची अशीच गत होणार आहे.” तसेच, “ज्यावेळी हे सर्व आमदार महाराष्ट्रात येतील तेव्हा त्या सर्वांचं स्वागत कसं होतं पाहाचं.” असा इशारा देखील दिला आहे.

याचबरोबर येरवडा येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोसले यांनी कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केले.यावेळी एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sainik aggressive against shiv sena rebel mlas in pune eknath shindes photo shoe agitation svk 88 msr
First published on: 26-06-2022 at 11:49 IST