पिंपरी: पक्षावर संकट आले असले तरी, शिवसैनिकांनी खचून जाऊ नये. संघटना वाढीसाठी मनापासून व जोमाने काम करावे, असे आवाहन शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आकुर्डीतील बैठकीत बोलताना केले. फिनिक्स पक्षाप्रमाणे शिवसेना पुन्हा उभारी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांत राज्यस्तरावर झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आकुर्डीतील सेनाभवनात बैठक पार पडली. माजी आमदार गौतम चाबुकस्वार, वैभव थोरात, उर्मिला काळभोर, बाळासाहेब वाल्हेकर, मधुकर बाबर, राजेश वाबळे, अनंत कोऱ्हाळे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.,

उपस्थितांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बारणे म्हणाले, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच वर्षात राज्याच्या हिताचे जे निर्णय घेतले, त्याची माहिती सर्वदूर पोहोचवण्याची गरज आहे. करोना संकटकाळात कुटुंबातील सदस्याप्रमाणे सर्वांना धीर देतानाच उध्दव ठाकरे यांनी राज्याला संकटातून बाहेर काढण्याचे महत्वपूर्ण काम केले. सध्याच्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे. खचून न जाता जोमाने काम केले पाहिजे, असे बारणे म्हणाले.