संख्याबळ कमी, तरीही सत्तेत बळ

युतीमुळे महापालिकेत शिवसेनेचा विषय समित्यांमध्ये शिरकाव

युतीमुळे महापालिकेत शिवसेनेचा विषय समित्यांमध्ये शिरकाव

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती झाल्याचा अनपेक्षित फायदा महापालिकेत शिवसेनेला होणार आहे. युतीच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेतील सत्तेमध्ये सहभागी करून घेत काही पदे द्यावीत, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली असून शिवसेनेची ही मागणी पूर्ण होण्याचे संकेत भाजपकडून देण्यात आले आहेत. या मागणीनुसार महापालिकेतील विषय समित्यांवर शिवसेनेच्या नगरसेवकांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती झाली नाही आणि हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला असला तरी दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगळे लढले होते. या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले तर शिवसेनेला नऊ जागांवर समाधान मानावे लागले.

राज्यातील शिवसेनेप्रमाणेच पुण्यातही भाजपची कोंडी करण्याची संधी शिवसेनेकडून सोडण्यात आली नाही. पाणीटंचाई, महापालिकेतील पक्षाच्या बेजबाबदार कारभाराविरोधात शहर शिवसेनेकडून सातत्याने आंदोलने आणि मुख्य सभेत टीका करण्यात आली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडी घडल्या आणि भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणुका एकत्र लढविणार असल्याचे जाहीर केले. त्याचे पडसादही महापालिकेच्या पटलावर दिसून येण्यास सुरुवात झाली.

युती झाल्यामुळे उपमहापौरपदासह अन्य काही पदांची मागणी शिवसेनेकडून भाजपकडे करण्यात आली. तशी जाहीर मागणी शिवसेनेकडून करण्यात आल्यानंतर भाजपनेही या मागणीला प्रतिसाद दिला. त्यामुळे महिला बालकल्याण समिती, क्रीडा समिती, विधी समिती आणि शहर सुधारणा समितीमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रभाग समिती अध्यक्षपदही भारतीय जनता पक्षामुळे शिवसेनेच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. प्रभागात विकासकामे करण्यासाठी नगरसेवकांकडून देण्यात येणाऱ्या कामांचे प्रस्तावासह अंदाजपत्रकामध्येही शिवसेनेच्या नगरसेवकांना मोठा निधी मिळेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेत नगरसेवकांची संख्या अल्प असूनही भरघोस लाभ शिवसेनेला मिळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेला सत्तेमधील पदे दिल्यास शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महापालिकांमध्येही भाजपकडून पदे मागण्यात येणार आहेत. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार आहे.

युतीच्या निर्णयानंतर महापालिकेत पदे मिळविण्यासंदर्भात शहर भाजपच्या नेत्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. शिवसेनेकडून त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले असून येत्या काही दिवसांत त्याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे.

– बाळा कदम, शिवसेना संपर्कप्रमुख

महापालिकेत पदे मिळावीत, असा प्रस्ताव शिवसेनेकडून देण्यात आला आहे. त्या बाबत पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासंदर्भात निर्णय घेतील, त्यानुसार स्थानिक स्तरावर निर्णय घेतला जाईल.

– श्रीनाथ भिमाले, सभागृहनेता

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena bharatiya janata party alliance benefit in pune municipal corporation