राष्ट्रवादीतून आलेले सचिन तावरे.. उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपला ‘जय श्रीराम’ केलेले मिलिंद एकबोटे.. राष्ट्रवादी ते शिवसेना व्हाया मनसे असा प्रवास केलेले सुनील टिंगरे.. आदल्या दिवसापर्यंत रिपब्लिकन पक्षात असलेल्या परशुराम वाडेकर यांनी खांद्यावर घेतलेला भगवा.. पुणे शहरातील चार मतदारसंघातील हे वास्तव समोर असताना एकही उमेदवार आयात केला नसल्याचा दावा शिवसेनेने बुधवारी केला.
शिवसेना-भाजप युती होईल या आशेवर असलेल्या शिवसेनेला युती तुटल्यानंतर चार जागांवर उमेदवार आयात करावे लागले अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. मात्र, शिवसेना नेत्यांना हे वास्तव मान्यच नाही. उपनेते शशिकांत सुतार यांनी ‘शिवसेनेने एकही उमेदवार आयात केला नाही,’ असे पत्रकार परिषदेत ठासून सांगितले. सचिन तावरे आणि सुनील टिंगरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मिलिंद एकबोटे हे तर, अनेक वर्षांपासून आमच्या परिवारातीलच आहेत. तर, परशुराम वाडेकर यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला आहे, असे मोकळेपणाने स्पष्टीकरणही शशिकांत सुतार यांनी दिले. या चौघांखेरीज श्याम देशपांडे, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, प्रशांत बधे हे उमेदवार, शहरप्रमुख अजय भोसले, रमेश बोडके, निर्मला केंढे, राधिका हरिश्चंद्रे या वेळी उपस्थित होत्या.
शिवसेना-भाजप युतीमध्ये कसबा, पर्वती, शिवाजीनगर, आणि खडकवासला हे चार मतदारसंघ भाजपला तर, कोथरूड, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी हे चार मतदारसंघ शिवसेनेला असे गेल्या निवडणुकीतील जागांचे वाटप झाले होते. यंदा शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे शहरातील आठही जागांवर उमेदवार शोधण्यापासून निवडणूक लढण्यापर्यंत धावपळ झाली असेल, असा प्रश्न करण्यात आला. तेव्हा पक्ष म्हणून आम्ही सर्व जागांवर लढण्याची तयारी पूर्वीच केली होती. विधानसभेवर भगवा फडकाविण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न आम्ही स्वबळावर पूर्ण करू, असा विश्वास असल्याचे सुतार यांनी सांगितले. ज्या मतदारसंघात पूर्वी धनुष्यबाण नव्हते, तेथे आता शिवसेना उमेदवाराला मतदान करता येणार आहे. त्यामुळे जुने शिवसैनिकही झटून काम करीत आहेत. शिवसेनेइतके निष्ठावान कार्यकर्ते दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये नाहीत. हे आमचे बलस्थान असल्याचे सुतार यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांचा रोड शो
शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराबरोबरच युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा गुरुवारी (२ ऑक्टोबर) शहरातील सर्व मतदारसंघातून रोड शो होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ९ ऑक्टोबर रोजी जाहीर सभा होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्या जाहीर सभा होणार असल्याचे शशिकांत सुतार यांनी सांगितले.