शिवसेना नेते संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी स्थानिक शिवसेना नेत्यांनी आज प्रतीकात्मक किरीट सोमय्यांचा बुरखा फाडत त्यांना घोटाळ्याची फाईल सुपूर्द करण्यात आली. महाविकास आघाडीमधील भ्रष्टाचार काढून काही व्यक्तींना बदनाम करण्याचं काम सोमय्या करत आहेत. मात्र पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचार त्यांना दिसत नाही. म्हणून त्यांचा आज बुरखा फाडून आंदोलन केल्याचे शिवसेना संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या आहेत. 

यावेळी सुलभा उबाळे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटीच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाने करदात्यांच्या तिजोरीवर डल्ला टाकला आहे. भाजपा नेते आमदार प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांचीच कंपनी असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ही लूट झाल्याचे कागदोपत्री पुरावे सांगतात अस उबाळे म्हणाल्या. राज्यभर ईडी, सीबीआय च्या माध्यमातून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्यांना या प्रकरणाबद्दल पत्र दिले असता त्यांची अक्षरशः बोबडी वळली अन तोंड बंद केले आहे. आता शिवसेना आपल्या पध्दतीने या भोंदू किरीट सोमय्या यांच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा फाडणार आहे. महापालिका आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा शिवेसेना आगामी काळात या पेक्षा आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवेसेना संघटिका सुलभा उबाळे यांनी दिला आहे.

स्मार्ट सिटी घोटाळ्याप्रकरणी पालिका आयुक्त, ईडी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार केला आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने जनतेच्या पैश्यांची लूट सुरू आहे. ५२० कोटींच्या कामात १७० कोटींचा घोटाळा तर एकूण १३०० कोटींच्या कामात ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप उबाळे यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्मार्ट सिटीच्या घोटाळ्याची चौकशी करावी, असे खुले आव्हान सुलभ उबाळे यांनी दिले आहे.