शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानाने महाविकास आघाडीत नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांचंच सरकार असते, हे लक्षात घ्या, कारण राज्यात सध्या ठाकरे सरकार आहे. पण सगळे आपलेचं आहेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत. पुण्यातील जून्नर तालूक्यातील शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेची गरज सगळ्यांना लागते. राष्ट्रवादीला लागते, काँग्रेसला लागते आणि भाजपालाही लागतेच. यालाच पॉवर म्हणतात. महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाचं सरकार असलं तरी ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांचंच सरकार असतं हे लक्षात ठेवा.”

पुढे बोलतांना संजय राऊत यांनी आपले वक्तव्य सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “हे ठाकरे सरकार आहे ना, हे कालं झालं, आता झालंय, दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नावाचं सरकार नाही. ठिक आहे पण सगळे आपलेचं आहेत.”

स्वबळासंदर्भातील चर्चांवर संजय राऊतांचे वक्तव्य

यापुर्वी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना स्वबळावर लढण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त करणाऱ्या पक्षांबद्दल राऊतांनी भाष्य केलं होतं. भाजपा, काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असेल तर शिवसेना-राष्ट्रवादीची युती का होऊ शकत नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. “महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र लढावं लागेल. आम्ही स्वबळावर लढू असं शिवसेना आणि राष्ट्रवादीपैकी कोणीही म्हटलेलं नाही. भविष्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्रातील दोन पक्ष एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल,” असं राऊत म्हणाले.