पुणे : बालगंधर्व रंगमंदिराची मूळ वास्तू कायम ठेवून रंगमंदिराचे विस्तारीकरण करावे. मात्र बालगंधर्व रंगमंदिर पाडून तेथे मॉल, बहुउद्देशीय हॉल आणि छोटी-मोठी तीन नाटय़गृहे बांधण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास महापालिकेकडून करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र बालगंधर्व रंगमंदिर पाडून तेथे नाटय़संकुल उभारण्याबाबत विविध मतप्रवाह पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही बालगंधर्व रंगमंदिराची मूळ वास्तू पाडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याबाबतचे निवेदन शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी गटनेता पृथ्वीराज सुतार, सहसंपर्क प्रमुख श्याम देशपांडे आणि प्रशांत बधे यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांना दिले.

बालगंधर्व रंगमंदिर पाडून येथे नव्याने मॉल, बहुद्देशीय सभागृह, कलादालन, विविध आसन क्षमतेची तीन नाटय़गृहे बांधण्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिर नाटय़ कलावंत आणि पुणेकरांसाठी अस्मितेचे प्रतीक आहे. बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करताना रंगमंदिराची मूळ जुनी वास्तू कायम ठेवून नवीन नाटय़गृह उभारता येऊ शकते. बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी मांडण्यात आला, तेंव्हा त्याला पुणेकर, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नाटय़कर्मीनी विरोध केला होता. त्यामुळे हा विषय मागे पडला होता. मात्र पुन्हा हा प्रस्ताव दामटून महापालिका प्रशासन नक्की कोणाचे हित साधत आहे, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे, अशी भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मांडली.

शहरात साधारणपणे चौदा ते पंधरा छोटी-मोठी नाटय़गृह-सांस्कृतिक केंद्रं आहेत. त्यातील अनेक वास्तू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळ खात पडून आहेत. काही नाटय़गृहांचे काम रखडले असून काही नाटय़गृहांची कामे सुरू आहेत. आत्तापर्यंत कोणतेही नाटय़गृह दहा वर्षांच्या आत बांधून झालेले नाही. हा इतिहास पाहता बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शिवसेनेचा विरोध राहील. मात्र रंगमंदिराची मूळ वास्तू कायम ठेवून विस्तारीकरण करण्यास शिवसेनेचा पाठिंबा असेल. मात्र प्रशासनाने पुणेकरांवर जबरदस्तीने हा प्रस्ताव लादण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.

अन्य मागण्यांवरही चर्चा

कर्वे रस्त्यावरील नव्याने बांधलेल्या दुमजली उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तज्ज्ञांशी चर्चा न करता आणि अभ्यास न करता उड्डाणपूल बांधण्यात आला. त्यामुळे छोटय़ा-मोठय़ा रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असून पार्किंगचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करतानाज्ज्ज्ञ, तंत्रज्ञ, नागरिक आणि सामाजिक संस्थांना विश्वासात घेऊन नियोजन करण्यात यावे, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच अपुऱ्या आणि विस्कळीत पाणीपुरवठय़ाबाबतही नाराजी व्यक्त करताना पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena opposes demolition of bal gandharva ranga mandir zws
First published on: 13-05-2022 at 04:15 IST