पुणे : ‘शहरात शिवसेनेचे (शिंदे) अस्तित्वच दिसत नाही. अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेला मोठा फटका बसतो आहे. शिवसेनेचे अस्तित्व टिकवून शिवसेनेला पुनरुज्जीवित करायचे असेल, तर अंतर्गत गटबाजी थांबवा‚’ अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खडसावले. गटबाजी थांबली नाही, तर ऑगस्टअखेर नवी कार्यकारिणी जाहीर केली जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला.

विशेष मतदार पुनरीक्षण मोहीमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नियुक्ती ( बीएलए) आणि पुणे शहर आणि ग्रामीण भागाचा संघटनात्मक आढावा उदय सामंत यांनी गुरुवारी घेतला. विधान परिषदेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे‚ महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर‚ शहर प्रमुख प्रमोद भानगिरे‚ युवा सेनेचे किरण साळी‚ बारामती संपर्क प्रमुख किरण लांडगे‚ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख हनुमंत जगदाळे यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. बीएलए नियुक्तीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.

या बैठकीत महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर‚ शहरप्रमुख प्रमोद भानगिरे आणि युवा सेनेचे किरण साळी यांची कडक शब्दात कानउघाडणी करण्यात आली. ‘माजी आमदार असूनही कसबा मतदारसंघात ‘बीएलएं’ची वेगाने नियुक्ती का झाली नाही‚’ अशी विचारणा धंगेकर यांच्याकडे करण्यात आली. तर, ‘घरातच पदे का वाटता, हडपसरपुरते मर्यादित का राहता,’ अशा शब्दांत भानगिरे यांची कानउघाडणी करण्यात आली.

‘कोथरूड‚ पर्वती‚ शिवाजीनगरमध्ये अस्तित्व दाखवा,’ अशी सूचना त्यांना करण्यात आली. तर, ‘शहरात युवा सेना कुठे आहे, युवा सेनेचे अस्तित्वच दिसत नाही,’ असे खडे बोलही किरण साळी यांना सुनावण्यात आले. ‘अंतर्गत गटबाजीचा फटका शिवसेनेला बसतो आहे. त्यामुळे यापुढे गटबाजी खपवून घेतली जाणार नाही. गटबाजी थांबली नाही तर ऑगस्टअखेर नवी कार्यकारिणी जाहीर केली जाईल,’ असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान‚ पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चारही लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या २१ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.