पिंपरी : शिवसेना (शिंदे) पक्षाची पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकारिणी स्थगित करण्यात आली असून, सध्याचे पदाधिकारी हे प्रभारी म्हणून काम करणार असल्याचे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी जाहीर केले. एक महिन्याने नवीन कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहे. मात्र, चांगले काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदांवर कायम, तर काम न करणाऱ्यांना पदावरून दूर केले जाणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

पुणे आणि मावळचे संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर सामंत यांनी थेरगाव येथे आढावा बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. सामंत म्हणाले, संघटनेतील जे पदाधिकारी पदे घेऊन काम करीत नाहीत. त्यांना पदावर ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सध्याची कार्यकारिणी आजपासून स्थगित करण्यात आली आहे. आताचे पदाधिकारी हे प्रभारी म्हणून काम करणार आहेत. पुढील ३० दिवस मतदारसंघांतील संघटनेच्या कामाची माहिती घेतली जाणार आहे. चांगले काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदांवर कायम ठेवण्यात येणार असून, काम न करणाऱ्यांना पदावरून दूर करून नवे पदाधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. संघटना महत्त्वाची आहे. संघटनेपेक्षा कोणी मोठे नाही.’

‘पक्ष संघटनेच्या कामाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे झोकून देऊन काम करतात. त्यांच्याप्रमाणे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काम करावे,’ असे सामंत यांनी स्पष्ट केले. ‘पुढील तीन वर्षे कोणतीही निवडणूक नाही. त्यामुळे संघटना बळकट करण्याची मोठी संधी आहे. याचा फायदा घेऊन संघटना मजबूत होण्यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.