जुन्नर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने शिवनेरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शिवनेरीवर विशेष प्रेम होते. त्यांनी आणि आम्ही शिवरायांच्या कार्याची साक्ष असलेले राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त केले आहेत,’ असे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा २०३० मध्ये होणारा ४०० वा जयंती सोहळा अतिशय भव्य आणि जगभरचे डोळे दिपतील, असा साजरा केला जाणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शिवनेरी येथे पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून शिवजन्म सोहळा झाला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली . तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी, जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘शिवनेरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाले.त्यास २७ देशांनी एकमताने त्यास मान्यता दिली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी संबंधित प्रमाणपत्र स्वीकारले. त्यामुळे शिवरायांचे किल्ले आता अधिकृतपणे जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरवले गेले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही शिवरायांच्या कार्याची साक्ष असलेले राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला. तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त केले आहेत.’
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात समता, सन्मान, न्याय आणि स्त्रीसुरक्षा यांना प्राधान्य होते. शेतकरी समाधानी राहील, अन्याय-अत्याचार होणार नाहीत, अशी राज्यव्यवस्था त्यांनी उभी केली, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज भारताचा इतिहास आणि भूगोलही वेगळा असता. अनेक राजे-राजवाडे मोगलांच्या आधिपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडविलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. राज्यकारभारात विविध सुधारणा करताना शिवाजी महाराजांनी सुमारे ५० प्रकारचे कर रद्द करून सुटसुटीत करप्रणाली निर्माण केली. पाणी, जंगल यांचे नियोजन केले. भविष्यातील धोका ओळखून समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणांना रोखण्यासाठी जलदुर्ग उभारले. पोर्तुगीजांवर विजय मिळवून पश्चिम किनारपट्टी सुरक्षित केली. छत्रपतींच्या कारकिर्दीत समुद्रमार्गे आक्रमण करण्याची हिंमत कुणालाही झाली नाही, शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष राज्यातील गड किल्ले देत आहेत’ असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त मोहीम
‘राज्यातील गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन अधिक वेगाने करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त किल्ले स्वच्छता व जतन मोहीम राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांचे धैर्य ,त्याग , समर्पण ,दूरदृष्टी, युद्धनीती आजही सुशासनाची प्रेरणा देते. महाराजांनी जलव्यवस्था, अर्थकारण व पर्यावरण रक्षणाच्या संकल्पना चारशे वर्षांपूर्वीच राबविल्या. शिवराई ही चलन व्यवस्था त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक होते.’
‘अजित पवारांसाठी शिवनेरी प्रेरणास्थान’
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘ अनेक वर्षांपासून अजित पवार हे शिवजयंतीनिमित्त श्रद्धेने आणि निष्ठेने या ठिकाणी उपस्थित राहत असत. शिवनेरी किल्ला आणि ही शिवभूमी त्यांच्यासाठी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हते, तर ते त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत किल्ले शिवनेरीचा समावेश झाला आहे.’
दरम्यान, शिवनेरीवर मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, श्री विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, अभिनेता रितेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गणेश महाबरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार सुनील शेळके आदी उपस्थित होते.
