पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धस्थितीचा फटका रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महान सेनानी महादजी शिंदे यांच्या स्मारकाला बसला आहे. अमेरिकेतील न्यूयाॅर्कमध्ये नियोजित या स्मारकाचा मुहूर्त मार्चमध्ये होणार होता. परंतु, हा कार्यक्रम आजा जून किंवा जुलैमध्ये होणार आहे.
शौर्य, स्वराज्य आणि स्वाभिमान यांचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि महान मराठा सेनानी महादजी शिंदे यांचा इतिहास अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातही चिरस्थायी स्वरूपात झळकावा या उद्देशाने शिंदे सरकार फाउंडेशनच्या वतीने न्यूयॉर्कमधील नामांकित पर्यटनस्थळी हे पुतळे उभारण्याची तयारी केली होती. त्याचा मुहूर्त मार्चमध्ये ठरला होता. मात्र, युद्धस्थितीमुळे अमेरिकेतील हे स्मारक आता जून किंवा जुलै मध्ये उभारणार असल्याची माहिती शिंदे सरकार फाउंडेशनचे उत्तमराव शिंदे सरकार यांनी दिली.
शिंदे सरकार फाउंडेशन आणि न्यूयाॅर्क येथील छत्रपती रिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने न्ययॉर्कमध्ये या दोन महान योद्ध्यांचे पुतळे एप्रिल महिन्यात उभारण्यात येणार होते. ज्याची तयारी पुर्ण झाली होती आणि सर्वांना यांचे निमंत्रण ही देण्यात आले होते. परंतु, युद्धस्थिती पाहता अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचे प्रतिनिधी कल्याणजी यांनी उत्तमराव शिंदे सरकार यांना दूरध्वनीद्वारे विनंती करून या प्रस्तावित स्मारक कार्यक्रमाची तारीख काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याची मागणी केली.
त्यानुसार शिंदे सरकार फाउंडेशनची बैठक मंगळवारी झाली. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन स्मारकाच्या मुहूर्त कार्यक्रमाची नवीन तारीख जून किंवा जुलै महिन्यात जाहीर करण्यात येईल. युद्धस्थिती स्थिर झाल्यानंतर सार्वजनिकरित्या कार्यक्रमाची पुढील तारीख जाहीर केली जाईल, असे या बैठकीत ठरल्याची माहिती उत्तमराव शिंदे सरकार यांनी दिली.
प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांच्याकडून पुतळ्यांचे काम करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दिल्लीचे तख्त काबीज करण्याचे स्वप्र पाहिले होते. ते काम महादजी शिंदे यांनी पूर्ण केले. छत्रपतींचे स्वराज्य आणि महादजी शिंदेंची यांची ओळख जगभर व्हावी तसेच, त्यातून नागरिकांना प्रेरणा मिळावी, हा या स्मारक निर्मितीमागचा उद्देश आहे. स्मारकाची संकल्पना उत्तमराव शिंदे सरकार यांची आहे. या उपक्रमास केंद्र आणि राज्य सरकारचे सांस्कृतिक सहकार्य घेण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी मोठा आर्थिक खर्च येणार असून, सर्वाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे उत्तमराव शिंदे सरकार यांनी सांगितले.
