scorecardresearch

शिवाजी महाराज कधीच मुस्लिमांच्या विरोधात नव्हते – शरद पवार

म्हणून शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा काढला

शिवाजी महाराज कधीच मुस्लिमांच्या विरोधात नव्हते – शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार

शेतकऱ्यांच्या संपामुळे अस्वस्थ असणाऱ्या शरद पवार यांना चुकीच्या पद्धतीने मांडला गेलेला इतिहासही अस्वस्थ करतो आहे. समाजातील तरुण पिढीसमोर काही लोकांकाडून जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास मांडला जात असून, त्याला यश मिळत आहे. हा सर्व प्रकार अस्वस्थ करणारा आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात व्यक्त केले. महात्मा ज्योतिबा फुले इतिहास अकादमीतर्फे श्रीमंत कोकाटे यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कोल्हापुरचे छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, लेखक श्रीमंत कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, इतिहासात समाजावर परिणाम करण्याची ताकद आहे. पण चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला गेल्यामुळे समाजाची मानसिकता देखील त्या पद्धतीने वाहत असल्याचे पाहायला मिळते. शाळेत शिकवला जाणारा इतिहास शिक्षकांनी जे शिकवले त्यावर आधारित होता. शिक्षण देण्याचे काम हे विशिष्ट वर्गाला होते. त्यामुळे त्यांनी हवा तसाच इतिहास मांडला. आधारभूत इतिहासाची मांडणी करण्यासाठी अनेक पिढ्या गेल्या आहेत. त्यामुळे आधारभूत इतिहास पुढे येण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, अफजल खान हा प्रस्थापित राज्याच्याविरोधात लढण्यास आला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. अफजल खान मुस्लिम होता म्हणून त्याला महाराजानी मारले नाही. तर तो प्रस्थापित राज्याच्या विरोधात असल्याने त्याचा कोथळा काढला काढला. शिवाजी महाराज कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नव्हते. ते रयतेचे राजे होते. देशात अनेक राजे होऊन गेले. त्यांच्या नावाने त्या राज्याची ओळख आहे. मात्र महाराष्ट्र हे रयतेचे राज्य म्हणून आजही ओळखले जाते. ते कधी भोसलेच राज्य म्हणून ओळखले जात नाही, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-06-2017 at 14:31 IST

संबंधित बातम्या