पुणे : दुर्धर विकाराने ग्रस्त असलेल्या तरुणाने हडपसरमधील एका खासगी रुग्णालयात बाॅम्बसदृश वस्तू ठेवल्याचे उघड झाले आहे. संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी उपचारासाठी सात लाख रुपयांचा खर्च सांगितल्याने तरुणाने बाॅम्बसदृश वस्तू ठेवली. पसार झालेल्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली.
शिवाजी राम राठोड (वय २९ रा. कवठे, जुळे सोलापूर, सध्या रा. मांजरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ‘आरोपी नागपूरहून कोलकात्याला जाणार होता. तेथून नेपाळमध्ये पसार होणार होता. पसार होण्यापूर्वीच त्याला नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. त्याने समाज माध्यमातील चित्रफीत पाहून बाॅम्बसदृश वस्तू तयार केली होती’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयातील प्रसाधनगृहात बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली होती. बुधवारी सायंकाळी याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. बाॅम्ब शोेधक नाशक पथकाने बाॅम्बसदृश वस्तू हडपसर भागातील मोकळ्या जागेत निकामी केली. त्यानंतर तपास यंत्रणांनी राठोड याचा शोध घेऊन गुरुवारी नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली.
‘घातपाताचा प्रकार नाही’
‘बाॅम्बसदृश वस्तू ठेवणारा आरोपी राठोड हा दुर्धर विकाराने ग्रस्त आहे. हडपसरमधील खासगी रुग्णालयात तो उपचारासाठी गेला होता. रुग्णालयाकडून उपचाराचा खर्च सात लाख रुपये सांगण्यात आला होता. आर्थिक विवंचनेत असलेल्या राठोडने बाॅम्बसदृश वस्तू ठेवली. रुग्णालयाकडून आठ लाख रुपयांचा खंडणी उकळण्याचा विचार त्याचा होता. संबंधित प्रकार हा घातपाताचा नाही’, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले. ‘राठोडने बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रुग्णालयात बाॅम्बसदृश वस्तू ठेवली होती. त्यानंतर तो एका केशकर्तनालायत गेला. तेथून तो पुन्हा रुग्णालयाच्या परिसरात आला. तोपर्यंत पोलीस तेथे पोहोचले होते. रात्री अकरापर्यंत तो रुग्णालयाच्या परिसरात थांबला होता’, असे त्यांनी सांगितले.
४०० रुपयांमध्ये बाॅम्बसदृश वस्तू
राठोडने रुग्णालयाकडून खंडणी उकळण्याचा कट रचला होता. त्याने ऑनलाइन पद्धतीने १६० रुपयांचे घड्याळ खरेदी केली. लोखंडी पाईप, चिकटप्पीट, वायरचा वापर करुन त्याने बाॅम्बसदृश वस्तू तयार केली होती. चिकटपट्टी कमी पडल्याने त्याने एका दुकानातून ऑनलाइन पद्धतीने १५ रुपयांची चिकटपट्टी खरेदी केली होती. तांत्रिक तपासात या बाबी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढला.
आरोपी कपड्याच्या दुकानात कामाला
आरोपी राठोड हा मूळचा सोलापूरचा आहे. तो विवाहित आहे. हडपसरमधील मांजरी भागात भाडेतत्त्वावर खोली घेऊन तो राहत होता. पोलिसांना त्याचा पत्ता सापडला. त्याचा घरी गुरुवारी छापा टाकला. तेव्हा तो पंधरा मिनिटांपूर्वी बाहेर पडल्याची मााहिती पत्नीने पोलिसांना दिली. बाहेरगावी फिरायला चाललो आहे, असे त्याने पत्नीला सांगितले होते. मांजरी भागातील एका दुकानदाराकडून त्याने तीन हजार रुपयांची रोकड घेतली होती. ऑनलाइन पद्धतीने त्याने संबंधित दुकानदाराला तीन हजार रुपये दिले होते. नेपाळ येथे त्याची बहीण राहते. कोलाकात्यातून तो नेपाळला जाणार होता. त्याने कोलकात्यापर्यंतचे रेल्वे तिकट काढले होते. नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
