पालिकेची जलवाहिनी टाकण्यात येणारी गावे व आळंदी शहराला पाणी देण्याबाबत पालिका सकारात्मक निर्णय घेत नाही तोवर शेतकऱ्यांचा जलवाहिनीला विरोध कायम राहील, अशी भूमिका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली आहे.
आढळराव यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्धीस दिले असून, भामा आसखेडमधून पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, या शेतकऱ्यांना माझा पाठिंबा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. धरणासाठी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमीन द्यायची, जलवाहिनीसाठीही शेतकऱ्यांनी जागा द्यायची, पण या शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी देण्यास नकार द्यायचा, ही पालिका अधिकाऱ्यांची भूमिका अनाकलनीय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पालिकेची जलवाहिनी ज्या गावांमधून टाकण्यात येणार आहे. त्या गावांना पालिकेने पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा शेतकरी जलवाहिनीला विरोध करण्याची भूमिका बदलणार नाहीत. पालिकेला योजना राबवायची असेल, तर त्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.