पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल हिला शनिवारी अटक करण्यात आली. मुलाला वाचविण्यासाठी स्वत:च्या रक्ताचे नमुने दिल्याची कबुली तिने दिली. आतापर्यंत या अपघात प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालला शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात तिचा जबाब नोंदविण्यात आला. त्यामध्ये तिने मुलाला वाचविण्यासाठी स्वत:च्या रक्ताचे नमुने दिल्याची कबुली दिली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्याविरुद्ध यापूर्वी मोटारचालकाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी त्याला आणि त्याचे वडील सुरेंद्र अगरवाल यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>हिंजवडी-शिवाजीनगर मार्गासाठी पहिली मेट्रो पुण्यात दाखल

सध्या दोघेही येरवडा कारागृहात आहेत. मात्र नमुना बदलण्याप्रकरणातही विशाल सामील असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली आहे. रविवारी शिवानी व विशाल यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. त्या वेळी रुग्णालयात अल्पवयीन मुलासह चौघे जण उपस्थित असल्याचे निदर्शनास आले होते.

शिवानी अगरवालची ‘डीएनए’ चाचणी

रक्त नमुने बदलल्याचे लक्षात आल्यानंतर ते कोणाचे हे स्पष्ट होत नव्हते. विशाल अगरवाल याच्या डीएनएशीही ते जुळत नसल्याने पोलिसांनी तांत्रिक तपासाअंती शिवानी अगरवाल हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिने मुलाऐवजी स्वत:चे नमुने दिल्याची कबुली दिली. शिवानी अगरवाल हिने दिलेल्या कबुलीच्या पुष्टीसाठी तिची पोलिसांकडून डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.