पुणे : पंधरा दिवसांपूर्वी वडिलांनी आत्महत्या केली. पण, हिंगोलीतल्या १६ वर्षांच्या मुलाला शिकायचंय. कुटुंब जगवण्याचा प्रश्न आहे… लातूरमधील एका शेतकऱ्याच्या पत्नीला टीबीचं निदान होऊन तीन महिने झालेत; पण औषधालाही पैसे नाहीत… शिक्षक भरतीमध्ये निवड होऊन पुढच्या तयारीसाठी पुण्यात आलेली धाराशिवमधली २१ वर्षांची मुलगी पैसे नाहीत म्हणून भातावर दिवस काढतेय…

सप्टेंबरच्या एकाच महिन्यात ६,७७२ शेतकऱ्यांनी ‘शिवार’ या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तयार केलेल्या हेल्पलाइनवर मन मोकळे केले आहे. जूनमध्ये २,५६४, जुलैमध्ये १,५६४ आणि ऑगस्टमध्ये २,७८९ शेतकऱ्यांनी मदतीसाठी संपर्क साधल्याची माहिती शिवार फाउंडेशनचे संस्थापक आणि राज्य सरकारच्या शेतकरी आत्महत्या रोखणाऱ्या कृती दलाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. विनायक हेगाणा यांनी दिली. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी आलेल्या कॉलमध्ये २०.४७ टक्क्यांची वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘आधी महापूर, आता दुष्काळ आणि पुढचे वर्षभर पीकपाण्याची शक्यता नाही. मागच्या पुरात काही मिळाले नाही, म्हणून यंदा अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा काढलाच नाही. त्यामुळे सरकारी मदतही तुटपुंजीच मिळेल. सततच्या संकटांनी गडद झालेले प्रश्न, कुटुंबाचा सांभाळ कसा करायचा, कर्जाचे हप्ते, काहीच सुचत नाही. काय करू कळत नाही, आता जगून तरी काय करणार, अशा प्रश्नांनी हैराण झालेले शेतकरी आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नसल्याची भावना हेल्पलाइनवर संपर्क साधून व्यक्त करीत आहेत. संकटांच्या ओझ्याने दबलेल्या, खचलेल्या शेतकऱ्यांना थोडा धीर हवा आहे. तत्काळ मदत हवी आहे,’ असे हेगाणा यांनी सांगितले.

जिल्हानिहाय कॉलची संख्या

सप्टेंबरमधील कॉलची संख्या पुढीलप्रमाणे : नांदेड – ५८९, सोलापूर – ५२१, नागपूर आणि बीड – ४९३, धाराशिव – ४५८, लातूर – ४४८, परभणी – ३९३, अकोला – ३९३, छत्रपती संभाजीनगर – ३४८, अहिल्यानगर – ३४८, अमरावती – ३४७, यवतमाळ – २२५, जालना – १४८, वर्धा – १४२, हिंगोली – १३६, बुलढाणा – ११९, गोंदिया – ११६, वाशिम – १०४, रत्नागिरी – १०२, कोल्हापूर – ९६, सिंधुदुर्ग – ८८, गडचिरोली – ७९, जळगाव – ६२, नाशिक – ६१, सांगली – ५४, सातारा – ५१, भंडारा – ३४, पुणे – ३२, अमरावती – ३०, धुळे – २९, नंदुरबार – २२.

तरुण मुलांमध्ये निराशा

‘गेल्या काही वर्षांपासून शेतीचे सतत नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये नैराश्य आल्याचे दिसते. तरुण वयातच कुटुंब, शिक्षणाची जबाबदारी, लग्न होत नाहीत, आर्थिक गरजाही अपूर्णच. त्यामुळे अंगावर एकदम आलेल्या जबादारीला कशा पद्धतीने सामोरे जावे, हे तरुण मुलांना कळत नाही,’ असे विनायक हेगाणा यांनी नमूद केले.

वयानुसार कॉलची संख्या

  • १५ ते ३० : १८४२
  • ३० ते ५० : ३४८३
  • ५० च्या पुढील : १४४७
  • शिवार हेल्पलाइन : ८९५५७७१११५
  • मदतीसाठी संकेतस्थळ : http://www.shivarsansad.in