पिंपरी : पुण्यातील शनिवारवाड्याप्रमाणे आता राजकारणातही ‘काका मला वाचवा’ असा आवाज येत असल्याची टिप्पणी भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठान संघाचे अध्यक्ष डॉ. शिवलाल जाधव यांनी केली. ‘चिमण्यांनो फिरून परत या’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवरही त्यांनी भाष्य केले.
भटक्या विमुक्तांच्या व्यथा, वेदना जाणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केल्याने भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठान संघाच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या हस्ते शरद पवार यांना मानपत्र अर्पण करण्यात आले. समाजासाठी काम करणाऱ्यांचा पवार यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दापोडीत सोमवारी झालेल्या कार्यक्रमाला भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठान संघाचे अध्यक्ष डॉ. शिवलाल जाधव, कार्याध्यक्ष भारत जाधव, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरीचे शहराध्यक्ष तुषार कामठे आदी उपस्थित होते.
शिवलाल जाधव म्हणाले, शनिवारवाड्यात ‘काका मला वाचवा’ असा आवाज यायचा, असे म्हटले जाते. तसाच आवाज राजकारणातही येत आहे. भटक्यांना घरे द्यावीत. वसाहती निर्माण कराव्यात. आजही ९० टक्के भटके विमुक्त समाज दारिद्र्यात आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्येपैकी १४ टक्के समाज भटके विमुक्त आहेत. भटक्यांची एक कोटीच्या पुढे लोकसंख्या आहे. या नागरिकांकडे ओळख असणारी कागदपत्रे नाहीत. त्यामुळे कागदोपत्री ते भारताचे नागरिक नाहीत