पुणे : श्री शिवनेरी स्मारक समिती पुणे आणि जुन्नर शहर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने किल्ले शिवनेरी येथे फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला शुक्रवारी (६ मार्च) शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळी सात वाजता शिवाई मातेस अभिषेक, छबिना मिरवणूक, शिवजन्मोत्सव, छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम गडावर होणार आहेत. उत्सवाचे यंदा ४७ वे वर्ष आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे यांनी दिली.

ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी आणि शाहीर किसनराव हिंगे यांनी १९८० पासून शिवनेरी गडावर हा उत्सव सुरु केला. तीच परंपरा पुढे सुरू ठेवत शुक्रवारी श्री शिवाई मंदिर ते जन्मस्थळ अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची चांदीच्या शिवपालखीतून सवाद्य छबिना मिरवणूक निघेल. खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, शिवव्याख्याते सुधीर गाडे, मानद पशू कल्याण अधिकारी व गोरक्षक शिवशंकर स्वामी या वेळी उपस्थित राहणार आहेत. युवक-युवतींसह, शाहीर आणि शिवप्रेमी मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा प्रसाद म्हणून श्री क्षेत्र देहू संस्थानच्या वतीने श्री शिवछत्रपती शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षी महावस्त्र पाठविले जाते. त्याचप्रमाणे सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्यावतीने देखील महावस्त्र पाठविण्यात येणार आहे.

किल्ले शिवनेरीवर शुक्रवारी सकाळी सात वाजता शिवजन्मस्थळावर शिवशंकर स्वामी यांच्या हस्ते शिवाई मातेस अभिषेक व महापूजा होईल. उत्सवात पालखी सोहळा व पारंपरिक पद्धतीने पंचक्रोशीतील महिला पाळणा म्हणून सकाळी नऊ वाजता शिवजन्मोत्सव साजरा करतील. यावेळी भोसरी येथील इंद्रायणीनगरच्या रणरागिणी नारीशक्ती संस्थेच्या कलाकारांचर्फे छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. या सोहळ्यानंतर ध्वजारोहण होऊन शिवकुंजावर शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने शिवजागर हा पोवाडे सादरीकरणाचा कार्यक्रम आणि त्यानंतर धर्मविचार मंथन व धर्मसभा होणार आहे.

ऊर्मिला थोरवे, सुनंदा मडके, शीतल ठुसे, उज्ज्वला लोहकरे, ज्योती शेलार, पुष्पा गोसावी यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मधुकर काजळे, रमेश कर्पे आणि शिवप्रेमींनी उत्सवाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे. पंचक्रोशीतील पन्नास गावांमधून मोठया संख्येने शिवभक्त गडावर येणार असून महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शाहीर हेमंत मावळे यांनी केले आहे.