शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील या कारवाईवर भाष्य केलं आहे.

पुण्यात पर्यायी इंधन परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल बोलताना ते म्हणाले की, “राजकीय हेतूने कारवाई होत आहे असं स्पष्ट दिसत आहे. सूडाच्या राजकारणाची भावना घेऊन हे सर्व सुरु आहे. देशात जे काही सुरु आहे ते लोकशाहीचं, राजकीय वातावरण नसून दबावशाहीचं राजकारण आहे”.

अशा धमक्या यायला लागल्या की आता लोकशाही राहिलीये का? याचा विचार करण्याची गरज आहे असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. “परवा कोणीतरी जाहीर सभेत एका पक्षाला मतदान केलं नाही तर तुमच्यामागे चौकशी लावू अशी धमकी दिली. जनतेला अशी जाहीर धमकी देऊ लागले तर लोकशाही राहिलीये का हा विचार करणं गरजेचं आहे,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

शिवसेनेमध्ये एकजूट होत असून समोरुन येणाऱ्यांना ताकद दिसेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. मनसेसंबंधी विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी संपलेल्या विषयावर जास्त बोलायचं नसतं असा टोला लगावला.

अशा कारवाया होत असतील आणि तशा धमक्या येऊ लागल्या तर देशात न्यायप्रक्रिया आणि लोकशाही आहे का नाही हा विचार केला पाहिजे. देश कोणत्या दिशेने चालला आहे याचा विचार करणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले. शिवसैनिक आणि महाविकास आघाडी ही एकजूट एकमेकांसोबत भक्कमपणे उभी असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया…

दरम्यान, यावर बोलताना संजय राऊतांनी भाजपावर प्रतिहल्ला चढवला आहे. “कुठली प्रॉपर्टी? आम्ही काय प्रॉपर्टीवाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. आत्ता मी टीव्हीवर पाहिलं की मालमत्ता जप्त केली. हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपाला दान करायला तयार आहोत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.