राज्यात आगामी महापालिका निवडणुकीमध्ये आघाडी की युती करायची का नाही, याबाबत प्रत्येक राजकीय पक्षातील नेते स्थानिक कार्यकर्त्यांकडून चाचपणी करून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उध्द्वव ठाकरे यांच्या समवेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला असून भाजप बरोबर युती नकोच अशी भुमिका घेतली. त्यावर उद्धव ठाकरे उद्या गुरुवारी निर्णय घेणार आहेत. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार  डॉ. निलम गोर्‍हे, संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शहर प्रमुख विनायक निम्हण, राहुल कलाटे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीला अगदी थोडासा कालावधी राहिला असून त्या पार्श्वभूमीवर तीनवेळा बैठका झाल्या. त्यामध्ये कोणत्या प्रकारचा निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पदाधिकार्‍यांची मुंबईत मातोश्रीवर बैठक घेऊन युतीबाबतची मते जाणून घेतली. त्यात दोन्ही महापालिकांमध्ये सेनेची असलेली ताकद आणि सद्यस्थिती याचा आढावा घेतला. यावेळी अनेक पदाधिकार्‍यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये युती नको असा पवित्रा घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यावर पक्षप्रमुख उध्द्वव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.