Anil Parab ED Raid: शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २७ मे रोजी छापेमारी केली. ईडीने मुंबईसह पुणे आणि रत्नागिरी अशा एकूण सात ठिकाणी छापे टाकले होते. अनिल परब यांना दापोलीमधील जमीन विकणाऱ्या विभास साठेंच्या कोथरुडमधील घरावरही छापा टाकण्यात आला होता. विभास साठे यांच्या कोथरुडमधील कार्यालयात छापेमारी करण्यात आली होती. दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विभास साठेंचा मनसुख हिरेन होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानावर अनिल परब यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल परब कारवाई प्रकरणी किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; म्हणाले “विभास साठेंच्या जीवाला धोका, त्यांचा मनसुख हिरेन…”

PHOTOS: ईडीने अनिल परबांशी संबंधित जागांवर छापेमारी केलेली ‘ती’ सात ठिकाणं कोणती?

किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत विभास साठे यांच्या जिवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी अशी विनंती मी महासंचालक यांना केली असल्याचं सांगत सोबत पत्र शेअर केलं आहे.

PHOTOS: ईडीने अनिल परबांशी संबंधित जागांवर छापेमारी केलेली ‘ती’ सात ठिकाणं कोणती?

“अनिल परब रिसॉर्ट घोटाळाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. परब यांनी विभास साठे कडून जमीन घेतली होती. विभास साठे यांचे ‘मनसुख हिरेन’ होऊ नये,” असं किरीट सोमय्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

पत्रात काय म्हटलं आहे –

किरीट सोमय्यांनी महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. या घोटाळ्यासंबंधी अनेक तपास यंत्रणा, संस्थांनी तसंच पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी अनिल परब आणि त्यांच्या साई रिसॉर्ट एनएक्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल परब यांनी २०१७ मध्ये विभास साठे यांच्याकडून दापोली येथील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील जमीन घेतली व फसवणूक करत रिसॉर्ट बांधला,” असं सोमय्यांनी पत्रात सांगितलं आहे.

पुढे ते म्हणतात की, “अनिल परब या घोटाळ्यामुळे अडचणीत आले असून आम्हाला भीती वाटते की, अनिल परब हे विभास साठेंवर दडपण आणणार. विभास साठे यांचे मनसुख हिरेन होऊ नये हे पाहणे महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी आहे. विभास साठे यांच्या जीवाला धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी. त्यांचा मनसुख हिरेन होऊ नये हे पहावे ही विनंती”.

अनिल परब यांची प्रतिक्रिया

किरीट सोमय्यांच्या दाव्याबद्दल विचारण्यात आलं असता अनिल परब म्हणाले की, “मी किरीट सोमय्यांना कोणतंही उत्तर देण्यास बांधील नाही. मी त्यांना आजपर्यंत कोणतंही उत्तर दिलेलं नाही. ज्या यंत्रणांकडे तक्रार करण्याचा त्यांना अधिकार आहे त्यातील अधिकारी आम्हाला जे प्रश्न विचारत आहेत त्यांची उत्तरं आम्ही उत्तर देत आहोत”.

“ही नौटंकी गेल्या वर्षभरापासून सुरु असून त्याला उत्तर देण्यास बांधील नाही. जे काही आरोप असतील ते त्यांनी यंत्रणेकडे करावेत, ते आमची चौकशी करतील. त्यातून सत्य समोर येईल,” असंही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बुद्धीबळ स्पर्धेच्या उद्घाटनावेळी “बुद्धिबळाप्रमाणेच राजकारणातही डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे लागते. एकही चाल चुकली, तर पराभव ठरलेला असतो. आम्हीही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अशाच एका चुकीमुळे पराभूत झालो होतो,” असं म्हटलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले की, “बुद्धिबळ आहे, कोण कसा डाव खेळतं हे शेवटी कळतं. त्यामुळे यावर आता काही बोलणं योग्य राहणार नाही. बघू लढाईत काय होतं”.