शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल, गुरुवारी मुंबईतील मेळाव्यात युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेच्या नगरसेविकेसह पक्षातून निलंबित केलेल्या दोन नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान, हे सर्व नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते.

राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे पिंपरी – चिंचवडमध्ये युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे. मात्र, युतीचा निर्णय न झाल्याने शिवसेनेला पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा फटका बसला आहे. शिवसेनेच्या नगरसेविकेसह पक्षातून निलंबित केलेल्या दोन नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी महापालिका आयुक्त कार्यालयात जाऊन आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवाराचा प्रचार करून पक्षादेश मोडल्याच्या कारणावरून शिवसेना पक्षातून निलंबित केलेल्या नगरसेविका सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या नगरसेविका संगिता भोंडवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका माया बारणे आणि बाळासाहेब तरस यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसलाही रामराम ठोकला आहे. पाचही नगरसेवक येत्या दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

युती तुटल्याने भाजप आणि शिवसेना आता आमने-सामने आले आहेत. त्यामुळे पक्षांतराची लाट येणार आहे. शहरात भाजपची लाट असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इतर पक्षांतील नेते भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत शिवसेनेकडून आम्हाला पक्षात परत बोलावले जाईल, याची वाट पाहिली. मात्र शिवसेनेकडून कोणतीही विचारणा झाली नाही. उलट याआधी माझ्यावर आणि आशा शेंडगे यांच्यावर अन्याय झाला आहे, असा आरोप माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे. आपण पक्षाचा आणि पदाचाही राजीनामा देत आहोत, असेही सावळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आम्ही कोणत्या पक्षात जाणार आहोत, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट करू, असेही त्यांनी सांगितले.