पिंपरी : शिवसेना (ठाकरे) गटाच्या सहा खासदारांनी स्वतंत्र गट निर्माण केला आहे. कोणत्या खासदारांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत, हे लवकरच समजेल. पण, स्वतंत्र गट निश्चितपणे झाल्याचा दावा मावळचे शिवसेना (शिंदे) खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्यानंतर हे खासदार शिवसेना (शिंदे) पक्षात विलीन होतील. भविष्यात ठाकरे गटाचे सर्व खासदार, आमदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेृत्तव मान्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, गेल्या एक वर्षांपासून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर येण्याची चर्चा सुरु होती. त्यात सत्यता होती. याची कल्पना ठाकरे गटाच्या नेत्यांनाही होती. यासंदर्भात बुधवारी निर्णय झाला. दोन तृतीअंश सदस्यांना स्वतंत्रपणे गट तयार करता येतो. त्या गटाला लोकसभा अध्यक्ष मान्यता देऊ शकतात. त्यांच्या मान्यतेनंतर दुसऱ्या गटात सहभागी व्हायचे की नाही हे गटाने ठरवायचे असते. खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तो गट स्थापन झाला आहे. गट अस्तित्वात आल्यानंतर त्याची घोषणा होईल. याची प्रक्रिया वर्षभरापासून सुरु होती. आमच्या पक्षातील काही लोक अतिउत्साहापोटी ऑपरेशन टायगर अशी वक्तव्ये करुन जास्त प्रसिद्धी देत आहेत.
शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या खासदारांमध्ये खदखद होती. नेते भेटत नाहीत, काम करत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेते फिरले नाहीत. कार्यकर्त्यांना कोणतीही मदत केली नाही, अशी खदखद खासदारांमध्ये होती. ही कधीतरी बाहेर येणार होती. ठाकरे गटाचे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. शिंदे यांच्यावर शिवसैनिकांचा विश्वास आहे. ठाकरे गटाचे खासदार, आमदार कामानिमित्त त्यांना भेटतात. कोणताही दुजाभव न करता त्यांना निधी दिला जातो. भविष्यात सर्वजण शिंदे यांचे नेतृत्व मान्य करतील. ठाकरे गटाचे आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करतात. कोण आमदार संपर्कात आहेत. हे मला माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
