पुणे महापालिकेची निवडणूक शिवसेना पक्षप्रमुखाच्या आदेशानुसार स्वबळावर लढवणार असून, या निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर होईल, अशी घोषणा शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुबईमध्ये झालेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या, गटप्रमुखांच्या मेळाव्यात दिल्यानंतर पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पुण्यातील डेक्कन परिसरात शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर शहरप्रमुख विनायक निम्हण, माजी आमदार महादेव बाबर आणि महापालिकेतील गटनेते अशोक हरणावळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

विनायक निम्हण म्हणाले, शिवसेनेने ज्या पक्षाला बोट धरून चालायला शिकवले. त्यांना सत्तेची मस्ती आल्याचे दिसून येते आहे. ही त्यांची मस्ती जनता नक्कीच आगामी महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून उतरून दाखवेल. पुणे महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत काँग्रेस आणि मनसेतील काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

युती तुटल्याने येणाऱ्या काळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप अधिक प्रमाणात पाहावयास मिळण्याची शक्यता असून, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला नागरिकांनी भरभरून मते दिली आहेत. भाजपचे पुणे शहरात ८ आमदार आणि १ खासदार आहे. या आकडेवारी वरून पुणे शहरात शिवसेनेला मते मागताना कसरत करावी लागणार हे निश्चित मानले जात आहे. पुणे महापालिकेत गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. राष्ट्रवादीकडून सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. पण आता मित्र पक्ष शिवसेना स्वतंत्र लढणार असल्यामुळे भाजपला मते आपल्याच पक्षाकडे खेचण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागेल. त्याचबरोबर शहरातील ज्या भागात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे बळ आहे. तिथेही दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची कसोटी लागणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena pmc pune municipal corporation election vinayak nimhan shivsena candidate list
First published on: 27-01-2017 at 15:04 IST