कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपा उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधील पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांचं ‘हिमालयात जाईन’ हे वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आणि त्यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. पुण्यात शिवसेनेकडून “चंद्रकांत दादा हिमालयात कधी जाताय?” असं लिहिलेले पोस्टरच लावण्यात आले आहेत.

युवासेनेचे विस्तारक राजेश पळसकर यांनी पुण्यात चंद्रकांत पाटलांना खोचक प्रश्न विचारणारे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर हिमालयाचं चित्र असून सोबत रुद्राक्षमाळा आणि साधुंच्या वापरच्या इतर वस्तूही दिसत आहेत.

व्हिडीओ पाहा :

दरम्यान, चंद्रकांत पाटील १२ एप्रिलला मंगळवार पेठेतील बूथवर पोहोचले तेव्हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाचा यावेळी जयघोषण करण्यात आला होता. तसेच दादा हिमालयात जावा अशीही घोषणा यावेळी तरुण देत होते. अखेर कार्यकर्त्यांचा हा संताप पाहून चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांसोबत तेथून काढता पाय घ्यावा लागला होता.

चंद्रकांत पाटील हिमालयात जाण्याबाबत नेमकं काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील म्हणाले होते, “जे मला म्हणतात ना कोल्हापूरमधून पळून आले. ते तिथे निवडून आले नसते. मात्र आज मी एक चॅलेंज देतो की, कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल. जर निवडून नाही आलो, तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन.”

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेचाही तपशील दिला होता. ते म्हणाले होते, “मागील वर्षी विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मला अमित शाह यांनी सांगितले की, ‘आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी’. यावर मी सांगितलं की, अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे मला कुठे यात अडकून ठेवता? मी जर मोकळा राहिलो तर महाराष्ट्रभर फिरेन असं त्यांना सांगितले. आपण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचे जास्त जागा निवडून आणू.”

हेही वाचा : “दादा हिमालयात जाणार असतील तर मीही…”, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचा खोचक टोला

“मात्र, अमितभाईंनी आग्रह धरला. तुला विधानसभा लढवायची असून ‘आपको पुना मैं कोथरूडसे लढना है’ असंही सांगितलं. तसेच त्यानंतर माझ्या नावाची या मतदारसंघातून घोषणा झाली. त्यानंतर आजवर माझ्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मला मिळालेल्या शिकवणीनुसार कोणीही कितीही आरोप प्रत्यारोप केले, तरी आपण आपले काम करीत रहायचे. तेच मी आजवर करीत आलो आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं.

चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य कोठे केलं होतं?

भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वर्षपूर्ती कार्यालय अहवालाचे प्रकाशन २ नोव्हेंबर २०२० रोजी पुण्यात झाले होते. पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.