पिंपरी : जमिनीच्या वादातून शिवसेना (शिंदे) पक्षाच्या जिल्हाप्रमुखाने पिस्तुलातून गोळीबार केला. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री सुस-नांदे रोडवरील एका बांधकाम प्रकल्पावर घडला. बावधन पोलिसांनी जिल्हाप्रमुखासह दोघांना अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
शिवसेनेचे (शिंदे) जिल्हाप्रमुख बाळासाहेब रामदास चांदेरे (वय ५४, रा. सुसगाव) आणि संदेश सतीश माने (वय ३७, रा. कात्रज-कोंढवा रोड, कोंढवा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याबाबत नागेश मोहन राठोड (वय २१, रा. नर्हे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बावधन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी याबाबत माहिती दिली. फिर्यादी नागेश हे बुधवारी रात्री मित्रांना नर्हे येथील भूमकर पूल परिसरात भेटले होते. त्यावेळी एका मित्राने सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेल्या सुसगाव येथील बांधकाम प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर तिघांना सूस येथील एका बांधकाम प्रकल्पावर सोडले. तेथे तिघे काही वेळ गप्पा मारत बसले होते.
मध्यरात्री एकच्या सुमारास तिघे बांधकाम प्रकल्पाबाहेर आले असता समोर एक मोटार येऊन थांबली. त्यातून आरोपी चांदेरे खाली उतरून बांधकाम प्रकल्पासमोर आला. चांदेरे आणि जागामालक यांच्यात जमिनीवरून वाद सुरू आहेत. या वादातून चांदेरे याने फिर्यादीसह त्यांच्या सहकार्यांना शिवीगाळ सुरू केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चांदेरे याने एकाच्या कानशिलात मारली. त्यानेही प्रतिकार करत चांदेरे याच्या कानशिलात लगावली. याचवेळी चांदेरे याने पँटच्या बाजूला हात घालून पिस्तूल बाहेर काढले. दरम्यान, आणखी एक जण दुचाकीवर तेथे आला आणि शिवीगाळ व दमदाटी करू लागला. चांदेरे याच्या हातातील पिस्तूल पाहताच तिघांनी पळ काढला. दोघे हे स्मशानभूमीच्या दिशेने तर, एकजण महामार्गाच्या दिशेने धावले. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना एक गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला.
माहिती मिळताच बावधन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपींकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी मारहाण, शिवीगाळ, धमकी, लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणे, शस्त्र कायद्याचे उल्लंघन तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर तपास करीत आहेत.
ओढ्यातून पळताना पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी
आरोपी चांदेरे याने केलेल्या गोळीबाराचा आवाज ऐकताच तिघांनीसुसगाव स्मशानभूमीजवळील ओढ्यातून पळ काढला. त्यावेळी पळत असतानाच एकाने डायल ११२ वर संपर्क साधून गोळीबाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर एका मित्राला बोलवले. तो मोटार घेऊन स्मशानभूमीजवळ आला. त्यानंतर तिघे चांदणी चौक येथे गेले. सर्वांनी बावधन पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.
बाळासाहेब चांदेरे यांनी गुरुवारी मध्यरात्री गोळीबार केल्याची माहिती समोर आली. पोलिसांना माहिती मिळताच दोघांना अटक केली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले.
