पुण्यातील कोथरूड येथील शिवसृष्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असताना काही तासात आंबेगाव येथे खासगी ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीला निधी देऊ केला आहे. त्यामुळे सरकारची दुट्टपी भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पुणेकरांची फसवणूक करत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. अस्मिता परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली अस्मिता परिषदेतर्फे लाल महालावर मोर्चाही काढण्यात आला.

अजित पवार पुढे म्हणाले, पुणे शहरातील कोथरूड येथील जागेत नियोजित शिवसृष्टी प्रकल्पाबाबत मागील कित्येक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. या दरम्यान मेट्रो खालून जाणार की वरुन यावरच अधिक चर्चा झाल्याने या प्रकल्पास अधिक विलंब झाल्याची खंतही अजित पवार यांनी व्यक्त केली. मात्र मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समावेत झालेल्या बैठकीत शिवसृष्टीसाठी कोथरूड येथील बीडीपीच्या जागेत उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. बीडीपीच्या जागेत शिवसृष्टीचा उभारण्याच्या निर्णयाविरोधात काही नागरिक न्यायलयात धाव घेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. यामुळे हा प्रकल्प भविष्यात पूर्ण होईल का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

आंबेगाव येथील एका खासगी शिवसृष्टीला तब्बल ३०० कोटी देण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. हे लक्षात घेता महापालिका शिवसृष्टी उभारत असताना. राज्य सरकारने खासगी शिवसृष्टीला ३०० कोटी दिल्याने हे सरकार महापालिकेच्या शिवसृष्टीच्या बाजूने का खासगी शिवसृष्टी करणाऱ्या लोकांच्या बाजूने असा प्रश्न निर्माण झाला आहे.हा सर्व प्रकार पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकर नागरिकांची फसवणूक केल्याचे सांगत त्यांच्यावर निशाणा साधला. यावेळी लाल महालात भाजपने निवडणुकी पूर्वी दिलेल्या आश्वसनांची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ ३० मिनिटे मौन बाळगत निषेध व्यक्त करण्यात आला. तर या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव आणि भाई वैद्य यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.