scorecardresearch

डॉ. शोभा अभ्यंकर यांचे निधन

प्रसिद्ध गायिका आणि संगीत गुरु डॉ. शोभा विजय अभ्यंकर (वय ६८) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे निधन झाले.

डॉ. शोभा अभ्यंकर यांचे निधन

प्रसिद्ध गायिका आणि संगीत गुरु डॉ. शोभा विजय अभ्यंकर (वय ६८) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर हे त्यांचे चिरंजीव होत.
शोभा अभ्यंकर यांचा जन्म २० जानेवारी १९४६ रोजी झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री विषयात एम. एस्सी केले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे त्यांनी संगीताची तालीम घेतली. पं. वि. रा. आठवले यांच्याकडून त्यांनी अनवट रागांचा विशेष अभ्यास केला. त्यानंतर ‘मेवाती’ घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीतमार्तंड पं. जसराज यांच्याकडेही त्यांचे शिक्षण झाले. नंतर त्यांनी चिरंजीव संजीव याला संगीत शिक्षण घेण्यासाठी पं. जसराज या गुरुंकडे सुपूर्द केले. एस. एन. डी. टी. महाविद्यालयातून संगीत विषयातील एम. ए. अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला होता. घशाच्या त्रासामुळे गायिका म्हणून त्यांनी कारकीर्द घडविली नसली तरी ‘गायन गुरु’ म्हणून त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्यांनी संगीताचे शिक्षण घेतले.
‘मराठी भावसंगीताची वाटचाल’ या विषयावर प्रबंध सादर करून शोभा अभ्यंकर यांनी पीएच. डी. संपादन केली. त्यासाठी संगीत क्षेत्रातील अनेकांच्या अभ्यासपूर्ण प्रदीर्घ मुलाखती घेतल्या होत्या. हा प्रबंध राजहंस प्रकाशनने ‘सखी. भावगीत माझे’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणला. डॉ. शोभा अभ्यंकर यांना गानहिरा पुरस्कार, वसंत देसाई पुरस्कार, पं. ना. द. कशाळकर पुरस्कार, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर पुरस्कार या पुरस्कारांसह गुरु म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘रागऋषी’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाने आजारी होत्या. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. शोभा अभ्यंकर यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या