पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मंगळवारी सकाळी बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर पुणे शहर, तसेच परिसरातील सर्व व्यापारी दुकाने गुरुवारी (२९ जानेवारी) बंद ठेवण्यात येणार आहेत.

‘पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी दुकाने गुरुवारी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहेत,’ अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.‘जनतेच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारा एक कर्तव्यदक्ष, परखड आणि प्रभावी नेता आज आपल्यातून निघून गेला, ही संपूर्ण महाराष्ट्रासह पुण्यातील व्यापारी बांधवांसाठी अपरिमित हानी आहे.

पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात राज्याच्या विकासासाठी, प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी उद्योग. व्यवसाय, व्यापारी वर्गाच्या प्रश्नांकडे नेहमीच सकारात्मक दृष्टीने पाहून निर्णय घेतले. पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासात पायाभूत सुविधा, अर्थकारण आणि व्यापारी हितसंबंध यासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून ते सदैव स्मरणात राहील’, अशी श्रद्धांजली रांका आणि पितळीया यांनी वाहिली.