‘एचआयव्ही’च्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या ‘सेकंड लाइन’ गोळ्यांचा गेल्या अनेक महिन्यांपासून तुटवडा सुरू असतानाच बुधवारी पुन्हा ससूनच्या ‘एआरटी’ (अँटी रेट्रोव्हायरल सेंटर) केंद्रात या गोळ्यांचा सपशेल खडखडाट होता. शुक्रवारी या गोळ्या देण्याचे आश्वासन केंद्राकडून देण्यात येत असले, तरी लांबून आलेल्या अनेक रुग्णांना गोळ्या न घेताच परत जावे लागले.

‘सेकंड लाइन’ गोळ्यांच्या तुटवडय़ाचा प्रश्न गेले अनेक महिने सुरू आहे. प्रत्येक वेळी थोडय़ात दिवसांत प्रश्न सुटेल असे सांगितले जाते, परंतु पुरवठा सुरळीत होत नाही. मे महिन्यात या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या गोळ्यांच्या ‘काँबिनेशन’मधील एकच प्रकारच्या गोळ्या रुग्णांना मिळत होत्या, तर एक प्रकारच्या गोळ्या विकत घ्याव्या लागत होत्या. या दोन गोळ्यांमधील महागडय़ा गोळ्या मिळत असल्याचेच समाधान रुग्ण वाटून घेत होते. परंतु आर्थिक परिस्थिती अगदीच हलाखीची असलेल्या रुग्णांना दरमहा पुण्याच्या वाऱ्या करणे व पुन्हा गोळ्यांसाठीही सातशे ते आठशे रुपये खर्च करणे परवडत नसल्याचेच रुग्णांकडून ऐकायला मिळत होते. बाहेरगावच्या काही रुग्णांशी पुन्हा बोलले असता ते गेले २ ते ३ महिने दरमहा एक प्रकारच्या गोळ्या विकतच घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

या बुधवारी मात्र महाग व तुलनेने स्वस्त अशा दोन्ही गोळ्या उपलब्ध नव्हत्या. तसेच केंद्रात गोळ्या शुक्रवारी देण्याचे आश्वासन देणारे पत्रकच लावण्यात आले होते, असे एका रुग्णाने सांगितले. ‘‘लांबून येणाऱ्या रुग्णांना गोळ्या मिळणार नसल्याचे कळवणे अपेक्षित होते. रुग्ण आपापल्या फाइल्स घेऊन रांगेत उभे राहिल्यानंतर गोळ्या मिळणार नसल्याचे कळले. यातील महागाच्या गोळ्यांसाठी २२०० ते ३५०० रुपये खर्च करावे लागतात. पैशांअभावी रुग्णाचा डोस चुकणे तब्येतीच्या दृष्टीने चांगले नाही,’’ असेही या रुग्णाने सांगितले.

ससूनच्या एआरटी केंद्राचे प्रमुख डॉ. डी. बी. कदम म्हणाले, ‘‘ ‘एमसॅक्स’कडून (महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था) आम्हाला गुरुवारी संध्याकाळपर्यंत गोळ्यांचा पुरवठा करत असल्याचे कळवण्यात आले. त्यामुळे आम्ही रुग्णांना शुक्रवारी गोळ्यांसाठी येण्याची विनंती केली होती.’’

‘एमसॅक्स’चे पुण्याचे प्रभारी जिल्हा अधीक्षक बालाजी टिंगरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.