पुणे : लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या ‘ईठा’ या नावाला राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने आक्षेप घेतला आहे. विठाबाई यांच्या नावाचा आणि त्यांच्या कलेचा योग्य सन्मान राखण्यासाठी चित्रपटाचे नाव ‘विठाबाई’ किंवा ‘विठा’ असे करण्यात यावे, अशी विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली.

या संदर्भात चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान, लेखक-दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर, तसेच मेडडॉक फिल्म प्रॉडक्शन यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले.

पाटील म्हणाले, “महाराष्ट्राच्या लोककलेचा अभिमान असलेल्या लावणी आणि तमाशा परंपरेला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कारविजेत्या लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती होत आहे, ही बाब महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव ‘ईठा’ असे ठेवण्यात आले आहे. या नावाबाबत आम्ही आक्षेप नोंदवला आहे. ज्या महान कलाकाराच्या संघर्षमय जीवनावर हा चित्रपट आधारित आहे, त्या कलाकाराचे नाव विठाबाई नारायणगावकर आहे. त्यामुळे विठाबाई यांच्या नावाचा आणि त्यांच्या कलेचा योग्य सन्मान राखण्यासाठी चित्रपटाचे नाव ‘विठाबाई’ किंवा ‘विठा’ असे करण्यात यावे.”

‘विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेला नवी ओळख दिली. त्यांच्या योगदानाचा गौरव करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. चित्रपटाच्या नावातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आणि इतिहासाची ओळख पुढे जाणे गरजेचे आहे,’ याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

कोण आहेत विठाबाई?

‘छावा’ चित्रपटाच्या यशानंतर लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित करत असलेल्या ‘ईठा’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर ही लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. मराठी संस्कृतीशी नाळ जोडली गेलेल्या अभिनेत्रीची या भूमिकेसाठी निवड झाली आहे. व्यक्तिगत जीवनात गरोदर असतानाही ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची’ या लावणीवर विठाबाई यांनी नृत्यासह अदाकारी केली होती. पोटात कळा येण्यास सुरुवात झाल्यानंतर रंगमंचामागे जाऊन त्यांनी मुलीला जन्म दिला आणि नाळ ठेचून पुन्हा रंगमंचावर येत त्या नृत्य करू लागल्या. ‘आमचे पैसे फिटले,’ असे म्हणत रसिक प्रेक्षकांनी विठाबाईंना विश्रांती घेण्याची विनंती केली होती. अशा विठाबाईंच्या जीवनावरील या चित्रपटामध्ये रणदीप हुडा नायकाची भूमिका करणार आहे. नाना पाटेकर आणि झीशान अय्युब यांच्याही चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका असून अजय-अतुल यांचे संगीत आहे.