पुणे : श्रावण मासात फुलांच्या मागणीत वाढ होते. झेंडू, शेवंतीला श्रावण मासात चांगला भाव मिळतो. मात्र, यंदा ऐन श्रावण मासात झेंडू, शेवंतीला कमी भाव मिळाला आहे. मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने भावात घट झाल्याची माहिती फूल बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.
एकीकडे झेंडू, शेवंतीची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी कमी आहे. आषाढ महिन्याच्या तुलनेत झेंडू आणि शेवंतीला २० ते ३० टक्के भाव मिळाला आहे. श्रावण मासात व्रतवैकल्ये केली जातात, सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. घरगुती ग्राहकांसह देवस्थानांकडून श्रावण मासात फुलांना मागणी असते. आषाढ महिन्यात फुलांना तशी मागणी कमी असते. श्रावणात फुलांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी चांगल्या प्रतीची फुले राखून ठेवतात. पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीची फुले बाजारात विक्रीस पाठविली आहेत.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात सोमवारी झेंडू २५ ते ४० टन, तसेच शेवंतीची १५ ते २० टन आवक झाली. पावसाने उघडीप दिल्यानंतर फुलांची आवक वाढली आहे. पावसाच्या सरींमुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे.
फूलउत्पादक नाराज
श्रावण मासात फुलांना चांगला भाव मिळतो. मात्र, यंदा झेंडू, शेवंतीला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने भावात मोठी घट झाली आहे.
आषाढ महिन्याच्या तुलनेत श्रावणात फुलांना मागणी वाढते. मागणी वाढल्याने फुलांचे भावही तेजीत असतात. यंदा फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने फुलांना अपेक्षेएवढे भाव मिळाले नाहीत.- सागर भोसले, समन्वयक,अखिल पुणे फूल बाजार अडते संघटना, मार्केट यार्ड
फुलांचे उत्पादन वाढल्याने आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. एकूण आवक विचारात घेतल्यास फुलांना अपेक्षित मागणी नाही.- संतोष कुंभारकर, फूल बाजार विभाग, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
फुलांचे भाव
| फुल | श्रावणातील एक किलोचा भाव | आषाढातील एक किलोचा भाव |
|---|---|---|
| झेंडू | १० ते २० रुपये | ५० ते ८० रुपये |
| शेवंती | ३० ते ४० रुपये | १०० ते १५० रुपये |
