बाळा जो जो रे.. दशरथ नंदना… बाळा जो जो रे.. चे स्वर आणि श्रीराम नामाच्या अखंड जयघोषात श्रीरामनवमी उत्सव पेशवेकालीन तुळशीबाग मंदिरात पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. तुळशीबागेतील श्रीराम मंदिरासह शहरातील विविध मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. तुळशीबागेतील श्रीराम मंदिरातील सोहळ्यात पारंपरिक वेशात भाविक सहभागी झाले होते. तुळशीबाग श्रीराम मंदिरातील उत्सवाचे २६२ वे वर्ष आहे. दुपारी बारा वाजून ४० मिनिटांनी सभामंडपातील पाळणा हलविण्यात आल्यानंत भाविकांनी श्रीराम नामाचा जयघोष केला. कीर्तनकार उद्धवबुवा जावडेकर यांनी जन्मकीर्तन सादर केले. या वेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले यांच्यासह तुळशीबागवाले कुटुंबीय उपस्थित होते. हेही वाचा >>>पुणे : बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाकडून १७ लाख उकळले मंदिरात सकाळी पवमान अभिषेकाने सोहळ्याला प्रारंभ झाला. मंदिरात आकर्षक पुष्पसजावट तसेच विद्युतरोषणाई करण्यात आली होती. त्यानंतर मंदिराच्या परिसरात श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. कीर्तन आणि श्रीरामजन्म सोहळा झाल्यानंतर पागोट्याचा प्रसादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. लोकमान्य टिळक चौकातील श्री लकडीपूल विठ्ठल मंदिरात श्री रामजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. भाविकांनी फुलांची उधळण करीत श्रीराम जन्माचा सोहळा साजरा केला. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार रामजन्मानंतर सायंकाळी मंदिरातून दिंडी निघाली आणि तुळशीबागेतील श्री राम मंदिरास भेट देऊन पुन्हा मंदिरात आल्यावर महाआरती झाली. अरुणा बांदल, सोनाली थोरात, सुरेखा काळभोर, रुपाली गाजरे, जयश्री अंबिके यांच्या हस्ते कलशपूजन झाले. ट्रस्टचे विश्वस्त दिलीप बांदल, दिलीप काळभोर, दीपक थोरात, बाळासाहेब ताठे, नरेंद्र गाजरे, महेश अंबिके, रमेश मणियार आदी उपस्थित होते.