पुणे : ‘प्रमोशनल हेतूने सुरू केलेला ‘चला हवा येऊ द्या’ यशाच्या शिखरावर जाणे, आमच्यासाठी आनंदाचे होते. पण, तोच शो जेव्हा दुसऱ्या वेळी सुरू झाला, तेव्हा त्याला म्हणावा तसा प्रतिसाद का मिळाला नाही ? याचे कारण म्हणजे प्रेक्षकांची सवय मोडली असावी,’ असा मोठा खुलासा लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे हिने पुण्यातील एका कार्यक्रमात केला.
राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांना ‘राम नगरकर कलागौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभानंतर सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले यांनी श्रेया बुगडे यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी श्रेयाने अभिनय आणि कारकिर्दीतील महत्त्वांच्या टप्प्याविषयी भाष्य केले.
शाळकरी वयापासून अभिनयाची आवड जोपासल्याचे सांगून श्रेया म्हणाली, ‘रत्नाकर मतकरी यांच्या ‘चमत्कार झालाच पाहिजे’, या बालनाट्यातून मला खरा ब्रेक मिळाला. माझा कल मला समजला आणि कुटुंबियांनीही सतत पाठिंबा दिला. ‘वाटेवरती काचा गं’, या नाटकातून अभिनयाचा वेगळा रंग मिळाला. कॉलेजपासून मी सातत्याने रंगभूमीवर स्पर्धांतून वावरले आणि सलग १४ वर्षे मी उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळवले होते.’
‘चला हवा येऊ द्या’ला प्रतिसाद का नाही ?
‘‘फू बाई फू’ मुळे छोट्या पडद्यावरचे यश पाहिले आणि ‘चला हवा येऊ द्या’ या सलग १० वर्षे गाजत राहिलेल्या शो मुळे मला खूप काही शिकता आले. आमची टीम, आमच्यातली मैत्री, जुळलेली केमिस्ट्री हे सारे विलक्षण होते. प्रमोशनल हेतूने सुरू केलेला हा शो, अशा पद्धतीने यशाच्या शिखरावर जाणे, आमच्यासाठी आनंदाचे होते. पण, हा काळ प्रत्येकाला खूप काही देणारा ठरला. ‘चला हवा येऊ द्या’ला दुसऱ्या वेळी प्रतिसाद मिळाला नाही, याचे कारण प्रेक्षकांची सवय मोडली, हे असावे,’ असेही श्रेयाने नमूद केले.
कलाकार सतत दिसत राहिल्याने अतिपरिचयाचा धोका जाणवतो का, या प्रश्नाला उत्तर देताना श्रेया म्हणाली, ‘आमची पिढी आणि आताची नवी पिढी याच्या उलट विचार आणि कृती करणारी आहे. जितके अधिक दिसू, तेवढे चांगले, अशा विचाराने ही पिढी वावरते. सोशल मिडियाची सर्व व्यासपीठे अधिकाधिक वापरते. प्रेक्षकांची अभिरुची बदलली आहे, त्याचा हा परिणाम असावा.’
‘भविष्यात मला माझा वैशिष्ट्यपूर्ण शो करण्याची इच्छा आहे. ज्यातून समाजातील काही गरजू घटकांना काही पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी मला मदत करता येईल,’ असेही तिने सांगितले.
‘श्रेया ही गुणी अभिनेत्री’
‘अनेकदा कलाकारांना एकाच प्रकारच्या भूमिका मिळत राहतात. त्यांचा साचा होऊ शकतो. पण, श्रेया भाग्यवान आहे. तिने आपल्या आजवरच्या कामात कमालीचे वैविध्य राखले. ती अतिशय गुणी अभिनेत्री आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले.
ख्यातनाम विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ११ हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून, टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी राम नगरकर यांच्या स्नुषा डॉ. वैजयंती वंदन नगरकर, उदय नगरकर आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचचे संस्थापक समीर बेलवलकर आदी उपस्थित होते.
वंदना गुप्ते यांनी याप्रसंगी स्वतःच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे प्रसंग सांगितले. ‘मी राम नगरकर यांचा अभिनय पाहिला आहे,’ अशी आठवण सांगून त्या म्हणाल्या, ‘श्रेयाच्या भात्यात अभिनयाचे असंख्य बाण आहेत. तिने उत्कृष्ट अभिनयाचे रंग प्रेक्षकांना दाखवले आहेत. तिने भूमिकांमध्ये जपलेल्या वैविध्याची असूया वाटावी, असे तिचे काम आहे.’
समीर बेलवलकर यांनी बेलवलकर सांस्कृतिक मंचाविषयी माहिती दिली. डॉ. वैजयंती नगरकर यांनी मनोगत व्यक्त केले. संध्या नगरकर यांनी मानपत्राचे वाचन केले. मंदा हेगडे यांनी आभार मानले.
