आपल्या आवडत्या व्यक्ती किंवा वस्तूवर आपण जसे प्रेम करतो, तसेच प्रेम पाण्यावरही केले पाहिजे. तिसरे महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी चर्चा केली जाते. त्यामुळे भविष्याचा विचार करता पाणी वाचवणे आपले आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी केले.
आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने आयोजित नदी स्वच्छता अभियानाचे उद्घाटन रविशंकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, आमदार मेधा कुलकर्णी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील मुळा, मुठा, रामनदी, पवना, इंद्रायणी, कृष्णा आणि गोदावरी या सात नद्यांचे पाणी भरलेल्या कलशात इको इन्झाइम टाकून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली.
वैज्ञानिक सिद्धता केल्यानंतरच नदी सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे असे सांगून रविशंकर म्हणाले, ‘‘नदीसुधार कार्यक्रम हाती घेण्याच्या आधी सखोल संशोधन करण्यात आले असून इको इन्झाइम टाकल्याने नदीला धोका नाही हे सिद्ध झाले आहे. पाणी वाचवण्यासाठी केवळ पैसे देऊन काम होणार नाही, त्याच्या जोडीला प्रेरणा असणे गरजेचे आहे.’’
जावडेकर म्हणाले, ‘‘८५ टक्के सांडपाणी सोडल्याने नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने नद्यांच्या सुधारणेचा संकल्प केला असून त्याची सुरुवात पुण्यातून झाली आहे.
मुळा-मुठा नद्यांसाठी केंद्राने एक हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुण्यात सांडपाणी शुद्धीकरणाचे अकरा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.’’