पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने महापालिका आणि सरकारच्या इतिहासाच्या अभ्यासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुणे महापालिका आणि राज्य सरकारकडून यंदा गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष साजरे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असल्याचे सागत पालिका आणि सरकारकडून चुकीचा इतिहास मांडला जात आहे, असे मंडळाने म्हटले आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी पुण्यातील गणेशोत्सवाला १८८२ पासून सुरुवात केली. त्यानुसार या वर्षी गणेशोत्वाचे १२६ वे वर्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत महापौर आणि राज्य सरकारकडे गतवर्षापासून पाठपुरावा करण्यात आला. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असून, येत्या आठवड्याभरात याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त सुरेश रेणुसे यांनी दिला. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी रेणुसे म्हणाले, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजानिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. मात्र, आजवर झालेल्या उत्सवात त्यांच्या नावाचा उल्लेख देखील केला जात नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. ते पुढे म्हणाले की, सुरूवातीच्या काळात तीन गणपती बसवले जात होते. त्यानंतर मानाच्या गणपतीचा उत्सव साजरा केला गेला. याच्या सर्व नोंदी इतिहासात पाहायला मिळतात. मात्र, सरकारकडून खऱ्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या पुढील काळात महापालिकेने याची दखल घ्यावी. तसेच त्यांच्या नावाने हा उत्सव साजरा केला पाहिजे.