पुणे : गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. सोमवारी (१४ सप्टेंबर) सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी उत्तर प्रदेश येथील श्री राधावल्लभ मंदिराचे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामी महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तर, याच दिवशी सायंकाळी सात वाजता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन होणार आहे.

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, सरचिटणीस-आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण या वेळी उपस्थित होते. कलादिग्दर्शक नीतेश कुमार आणि ग्लिटरी इव्हेंट्स या कंपनीने मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी, सोमवारी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून आकर्षक फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून गणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी १२ वाजेपासून श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेता येणार असल्याचे सूर्यवंशी यांनी स्प्ष्ट केले.

ते म्हणाले, ‘भक्ती प्रेम बनते आणि प्रेम देवत्व बनते, या संकल्पनेवर आधारित ही भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. संगमरवरी वास्तुकलेपासून प्रेरित भव्य दर्शनी भाग, उत्तर भारतीय मंदिराच्या पारंपरिक रचनेचे प्रतिबिंब दर्शवणारी कलाकुसर केलेले स्तंभ आणि घुमट, कृष्णलीला दर्शविणारे शिल्पपट आणि मंदिरावर दर्शनी भागात राधा-कृष्णाची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. स्वागतासाठी बुधवार चौकामध्ये भव्य कमान, तर दोन्ही बाजूंच्या मांडवावर कृष्णलीलेतील विविध प्रसंग साकारण्यात आले आहेत.

संपूर्ण परिसरात १५० कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच, पोलीस यंत्रणेबरोबर ट्रस्टचे २५० सुरक्षाव्यवस्था बंदोबस्तासाठी तैनात असतील.

गणेश भक्तांसाठी ५० कोटींचा विमा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि कटत बोर्ड हद्दीतील गणेश भक्तांसाठी ५० कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. त्यात चेंगराचेंगरी, दहशतवादी हल्ला किंवा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. अपघाती मृत्यूस प्रति व्यक्ती ५ लाख रुपये, अपंगत्व आल्यास २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांपर्यंत औषधांचा खर्च देण्यात येणार आहे.