पुणे : ‘ओम नमस्ते गणपतये’… ‘मोरया, मोरया’… आणि ‘ओम गं गणपतये नमः’ च्या जयघोषाने ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये मंग पहाटे हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. तब्बल ३५ हजारांहून अधिज महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष, अथर्वशीर्ष आणि महाआरतीने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवात उत्सव मंडपात झालेल्या उपक्रमास महापौर मंजूषा नागपुरे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके,सचिन आखाडे, अंकुश रासने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. पावसाचे वातावरण असले तरी पारंपरिक वेशात मध्यरात्री दोन वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाला हजेरी लावण्यास सुरुवात केली. उपक्रमाचे यंदा ४१ वे वर्ष होते.
महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर ओंकार जप, गणराजा गणनायका…मोरया रे बाप्पा मोरया रे… या गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. महिलांनी अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. मोरया मोरया दगडूशेठ मोरया… असा गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली.
महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या. मुंबई, सातारा, कोल्हापूर, लातूर आदी शहरातून महिला या उपक्रमासाठी आल्या होत्या. अर्चना भालेराव, प्रा. डॉ. गौरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
