पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने माघ शुद्ध चतुर्थीनिमित्त विनायक अवतार असलेल्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. सुवर्णपाळण्यामध्ये दुपारी गणेश जन्मसोहळा साजरा होणार आहे.
मंदिराला आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युतरोषणाई करण्यात आली होती.

मंदिरात गुरुवारी पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक आणि गणेश सूक्त अभिषेक करण्यात आले. त्यानंतर गणेश याग झाला. मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक पेहरावात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. नगरप्रदक्षिणा मिरवणूक सायंकाळी सहा वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून निघणार आहे. रात्री दहा ते पहाटे तीन वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे.

गणेशजन्मानिमित्त पहाटे तीन वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले असल्याने भाविकांची पहाटेपासून गर्दी झाली होती. पेशवे गणपती मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित नगरसेवकांनी विविध गणेश मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
