पुणे : ‘नदीला जाऊन धुणी धुवावित. पातिल्यात खेकडा शिजवून मनापासून खावा. जिथे डुलकी लागेल, तिथेच पडावं. गावाकडच्या या वातावरणातून शिकायला म्हणून पुण्यात, त्यात सदाशिव पेठेत आलो. इथे चांगली माणसे भेटली म्हणून घडत गेलो,’ असा प्रवास सांगत सनदी अधिकारी, खासदार, राज्यपाल आणि पुन्हा खासदार झालेल्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
श्रीनिवास पाटलांनी आपल्या खास शैलीत पुण्यातील विद्यार्थी जीवनाचे सांगितलेले किश्शे, हास्य, विनोद आणि कवितांनी सनदी अधिकारी झालेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रंगला.
सर परशुराम भाऊ महाविद्यालयात सनदी अधिकारी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. सदानंद उर्फ नंदू फडके, उपाध्यक्ष गजेंद्र पवार, नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, सचिव डॉ. राधिका इनामदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, डॉ. संज्योत आपटे, नियामक मंडळाचे सदस्य सतिश पवार, किरण शाळीग्राम, पराग ठाकूर, ॲड. मिहीर प्रभुदेसाई, सुधीर काळकर या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले,‘एस.पी. कॉलेजात १९५७ ते १९६१ या दरम्यान शिकत होतो. गावाकडून पुण्यात येण्यामागे मोठी गोष्ट आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील हे माझ्या वडिलांचे गुरू होते. त्यांनी दादा पाटील तुमचा मुलगा माझ्याच कॉलेजात जाईल, असे वडिलांना सांगितले. मात्र, ही गोष्ट समजली यशवंतराव चव्हाण साहेबांना. त्यांनी लगेचच मला बोलावून घेतले आणि पुण्याला स. प. महाविद्यालयात जाऊन ‘बीए’ करायला सांगितले.’ आता निवडणुक आहे म्हणून हे सांगत नसल्याचा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.
‘महाविद्यालयात शिकत असताना आम्ही विद्यार्थ्यांनी भीमसेन जोशी, मालती पांडे यांना दिडशे रुपये बिदागी देऊन कार्यक्रमाला आणले होते. त्यावेळी त्यांनी गायलेल्या ‘त्या तिथे पलिकडे, माझिया प्रियेचे झोपडे, गवत उंच दाट दाट, वळत जाय पायवाट, वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे’ या गाण्याच्या ओळी आजही कानात रूंजी घालतात. ते दिवस वेगळे होते. आम्ही चार-पाच जण सिनेमा बघून रस्त्यावरून मजा करत चालत जायचो. ‘जीवन मैं पिया तेरा साथ है,’ अशी गाणी गुणगुणत चालताना मोठी गमंत असायची,’ असा किस्सा पाटील यांनी सांगितला.
‘कुणी तरी यावं, आपल्याला बघावं आणि लांबून खूण करावी. कुठंतरी बसावं… यात फार मोठा आनंद असतो. महाविद्यालयातच तो अनुभवता येतो. रविवारी कुणी तरी न्हातं-धूतं आणि टॉवेलमध्ये गुंडाळलेले केस घेऊन आपसूक समोर येतं. मग आपण समोरून जात असताना एक गाणं मनोमन सुचतं. ‘न झटको ये झुल्फे, ये पाणी उड जायेगा, लेकीन हमारा दिल टूट जायेगा…’ दिल म्हणजे देणे आहे. हॉस्टेलपासून गेटपर्यंत कॉलेजच्या जीवनात वेगळीच मज्जा असते,’ अशी भावना श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.
शीतल तेली-उगले, नितीन खाडे, अजित जोशी, आनंदराव पाटील, मंगेश तिटकरे, विवेक वाडेकर या प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. आपटे यांनी सूत्रसंचालन केले. कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. विद्या अवचट यांनी आभार मानले.
‘जिथं लावलं तिथं टवटवित राहता आलं पाहिजे’
‘आता सगळीकडे नुसता धुराळा चालला आहे ; पण जुन्या आठवणींना आलेल्या उमाळ्यात वेगळी मजा असते. मनातल्या आठवणी इथेच तरतात. पान हिरवं दिसावं तशा.’ अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,‘खुशबू आणि महक यामध्ये फरक आहे. खुशबू लावावी लागते आणि महक आपोआप येत असते. ती आली की, खरा आनंद मिळतो. आई-वडील टिकात्मक बोलले आणि त्यांना आपण समाधानकारक उत्तर दिले की, त्यात एक वेगळी मजा असते.
केवळ अधिकारी म्हणजे म्हणजे जिंदगी नसते. त्याही पेक्षा जीवन सुंदर आहे. नाही अधिकारी झालो तर, ‘देअर ईज ऑलवेज रूम ॲट टॉप,’ हे लक्षात ठेवून काम करायला हवे. आपण जिथे काही दिवस खेळलो, बागडलो आणि रडलो. तिथे काही दिवस रमायला हवे. मेंदीच्या पानासारखं जिथं लावलं तिथं टवटवित राहता आलं पाहिजे.’
जीवनात कधी काय करायचे, हे कळले पाहिजे. एकदा दिशा ठरली की, परत डोक्याला हात लाऊन बसण्यात काही मजा नाही. – श्रीनिवास पाटील, माजी खासदार.
