पुणे : ‘पद्म पुरस्कारांसारखे राष्ट्रीय सन्मान आजकाल राजकीय खिरापतीसारखे वाटले जात आहेत. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्रातील अत्यंत गुणवंत, रोजगार आणि कौशल्य निर्माण करणाऱ्या संस्था व त्यांच्या प्रमुखांच्या कर्तृत्वाकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे,’ असा घणाघाती आरोप अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज पुण्यात केला.

सबनीस यांनी सध्याच्या पुरस्कार वितरण पद्धतीवर आणि सरकारच्या दुर्लक्षावर कडक ताशेरे ओढले. पुण्यात आडकर फाउंडेशनच्या वतीने यशस्वी संस्थेचे संस्थापक विश्वेश कुलकर्णी यांना ‘जिद्द’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सबनीस यांच्या हस्ते कुलकर्णी यांना गौरविण्यात आले. कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव करताना सबनीस यांनी, शासनाचे कुलकर्णी यांच्यासारख्या कर्तृतवान लोकांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली.

‘देशात पद्मश्री पुरस्कार राजकीय हेतूने किंवा खिरापतीसारखे वाटण्याचा प्रकार सुरू आहे, मात्र, गुणवत्तेच्या आधारावर काम करणाऱ्यांची दखल घेतली जात नाही. समाजात लाखो बेकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आणि समांतर शिक्षण व्यवस्था यशस्वीपणे चालवणाऱ्या कुलकर्णींसारख्या व्यक्तींचे कर्तृत्व अजोड आहे,’ असे सबनीस म्हणाले.

‘केंद्र असो, वा राज्य सरकार, त्यांना अशा अभूतपूर्व कौशल्याची आणि संस्थात्मक योगदानाची जाणीव का नाही,’ असा रोखठोक सवाल सबनीस यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला.

‘अत्यंत पात्र आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींची पद्मभूषण किंवा इतर सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारांसाठी महाराष्ट्र सरकार शिफारस का करत नाही,’ असा सवाल उपस्थित करून, त्यांनी महाराष्ट्र सरकारवरही ताशेरे ओढले.

‘अर्थात, सरकारने दखल घेतली नाही तरी संस्था आणि त्यांच्या प्रमुखांनी समाजासाठी केलेले कार्य हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे,’ असे त्यांनी नमूद केले.