पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्ग (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण मार्गावरील मामुर्डी ते वाकड दरम्यान सेवा रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने केले जात आहे. किवळे येथे रस्त्यांचे काम निकृष्ट झाले आहे. येत्या १५ दिवसांत सद्य:स्थितीतील निकृष्ट काम पूर्णपणे काढून टाकून नव्याने दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करण्याची सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिली.

महापालिका हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्ग (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण मार्गावरील मामुर्डी ते वाकड येथील मुळा नदीवरील पुलापर्यंत दोन्ही बाजूस सेवा रस्त्यांचा विस्तार करण्यात येणार आहे. १२ मीटर अंतराने रस्त्याचा विस्तार करण्याचा आराखडा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केला आहे. त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची खासदार बारणे यांनी पाहणी केली. यावेळी शिवसेना  शहर प्रमुख तथा नगरसेवक निलेश तरस, नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस, युवासेना मावळ लोकसभा राजेंद्र तरस यांच्यासह महामार्ग विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचे काम आढळून आले. नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि दैनंदिन वाहतुकीशी संबंधित कामांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कामामध्ये गुणवत्ता, टिकाऊपणा आणि नागरिकांच्या सुविधेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. या सेवा रस्त्याची पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्ती ठेकेदारच करणार आहे. काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे. कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे’, असे खासदार बारणे यांनी सांगितले.

कामाला गती द्या

या सेवा रस्त्याची पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्ती ठेकेदारच करणार आहे. काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे. कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. समीर लॉन्स परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळा तोंडावर येऊनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे कामाला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.