बिर्याणीचा दरवळ चहूकडे

काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरातील काही ठरावीक भागात आणि ठरावीक हॉटेलच बिर्याणीसाठी प्रसिद्ध होती.

शहरातील बिर्याणीच्या उपाहारगृहांमध्ये लक्षणीय वाढ

पुणे : सुवासिक मोकळ्या भातासह शिजलेल्या भाज्यांची किंवा चिकन, मटणाची बिर्याणी घेण्यासाठी उभे असलेले किं वा घेऊन खाणारे ग्राहक.. असे चित्र शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे, गेल्या काही महिन्यांमध्ये शहरभरात बिर्याणी देणाऱ्या हॉटेलांचे किंवा छोटय़ा ‘बिर्याणी जॉईंट्स’चे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरातील काही ठरावीक भागात आणि ठरावीक हॉटेलच बिर्याणीसाठी प्रसिद्ध होती. मात्र अलीकडे हे चित्र बदलले आहे. शहरभरात ठिकठिकाणी बिर्याणी देणारी हॉटेल, बिर्याणी जॉईंट तयार झाल्याचे दिसून येत आहे. हैदराबादी बिर्याणी, तंदूर बिर्याणीसह विविध प्रकारची बिर्याणी या उपाहारगृहांमध्ये, ‘बिर्याणी जॉईंट्स’मध्ये उपलब्ध होते. त्यामुळे बिर्याणी देणाऱ्या नामांकित उपाहारगृहांसह आता छोटय़ा उपाहारगृहांमध्येही किफायतशीर दरात बिर्याणी मिळू लागली आहे. खवय्येही या बिर्याणीचा आस्वाद घेताना दिसून येतात.

गारवा बिर्याणीचे भागीदार श्रेयस उभे म्हणाले, की माझे बंधू राजेंद्र शिंदे यांच्यासह जानेवारी २०२० मध्ये सदाशिव पेठेत बिर्याणीचे छोटेखानी हॉटेल सुरू केले. बिर्याणी आतापर्यंत ठरावीक ठिकाणी मिळायची आणि ती सर्वानाच परवडण्यासारखी नव्हती. त्यामुळे सर्वाना परवडणारी बिर्याणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

करोना काळात बिर्याणीला मोठी मागणी आहे. बिर्याणीमधून प्रथिने, कबरेदके  आदी घटक मिळत असल्याने बिर्याणी आरोग्यदायीही आहे. गेल्या दीड वर्षांत शहराच्या विविध भागात शाखा सुरू केल्या आहेत.

पूर्वी छावणी परिसरात असलेले कॅफे आता मध्यवर्ती शहरात आणि उपनगरांमध्ये मोठय़ा प्रमाणात झाले आहेत. या कॅफेंमधून बर्गर, मोमो, विविध प्रकारचे रोल्स मिळतात. बिर्याणी हा पोटभर खाण्याचा पदार्थ आहे. त्यामुळे नोकरदार, कामगार आणि विद्यार्थ्यांसाठी तो सोयीचा ठरतो. शहरातील वाढती लोकसंख्या, खाण्याच्या बदलत्या पद्धतींमुळे असे बदल होतात. विद्यार्थी, नोकरदारांचे पुण्यातील प्रमाण सततच वाढत असल्याने त्यांच्यासाठी पोटभरीचे पदार्थ उपलब्ध होण्याची गरज ओळखून कॅफे, बिर्याणीची हॉटेले वाढली आहेत. करोना काळात बऱ्याच गृहिणी, घरी राहणाऱ्या नोकरदारांनीही घरी बिर्याणी तयार करून देण्याचा व्यवसायही सुरू केल्याचे दिसून येते.

– चिन्मय दामले, खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक

बिर्याणी करण्याची पद्धत तशी सोपी आहे. बिर्याणी हा पदार्थ करायलाही किफायतशीर आहे. बिर्याणी हा वन पॉट मिल, म्हणजे एका भांडय़ात तयार होऊ शकणारा पदार्थ असल्याने फार जास्त व्यवधानेही नाहीत. तसेच बिर्याणी हा तसा टिकणारा आणि खायलाही सुटसुटीत असा पदार्थ आहे. नोकरदार, विद्यार्थ्यांना खाण्यासाठी बिर्याणी सोयीची ठरत असल्याने बिर्याणीची मागणी वाढली आहे. बिर्याणीची हॉटेल वाढणे हा सकारात्मक ट्रेंड आहे. बिर्याणीच्या वाढत्या हॉटेलांमध्ये ज्याची बिर्याणी चांगली असेल, ती हॉटेल टिकतील.

– विष्णू मनोहर, ज्येष्ठ  शेफ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Significant increase in biryani restaurants in the city pune ssh

ताज्या बातम्या