विद्याधर कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : गिर्यारोहण हे जोखमीचे काम आहे. त्यावर मात करीत एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न सत्यामध्ये आले याचा आनंद झाला. ही कामगिरी करणारा मी पहिला मराठी माणूस असल्याचे समजताच आनंद द्विगुणित झाला, अशी भावना दोन तपांपूर्वी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारे सुरेंद्र चव्हाण यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. 

जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टवर १८ मे १९९८ रोजी सुरेंद्र चव्हाण यांनी भारताचा तिरंगा फडकावला. त्या घटनेस बुधवारी (१८ मे) २४ वर्षे पूर्ण होऊन  या कामगिरीचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू होईल. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न सत्यामध्ये उतरविण्यात यश लाभले. एव्हरेस्टची पाऊलवाट मोठी करण्याची सुरुवात म्हणून या मोहिमेकडे पाहावे लागेल. आता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना ही अभिमानास्पद कामगिरी घडून गेली याचे समाधान वाटते, असे सुरेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

चव्हाण म्हणाले, एव्हरेस्ट सर करणारी पहिली नागरी मोहीम असा बहुमान प्राप्त करणारा आमचा संघ १३ जणांचा होता. सातजण शिखर चढाई करणारे तर सहा जण मदतीसाठी होते. हवामानाचा अचूक अंदाज घेऊन आम्ही चढाई सुरू केली. शेर्पा मदतीला होते. १८ मे रोजी एव्हरेस्ट सर करून भारताचा तिरंगा फडकावण्याचे भाग्य मला लाभले. त्यावेळी गिर्यारोहणासाठी आवश्यक साहित्य आम्हाला आयात करावे लागले होते. ६० दिवसांचा अन्नधान्याचा शिधा आणि बरेच दिवस टिकू शकतील असे कोरडे पदार्थ बरोबर घेतले होते.

सव्वा कोटींचा खर्च

एव्हरेस्ट सर करण्यासाठी १९९८ मध्ये तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च आला होता. आतासारखी परिस्थिती नसल्याने त्या वेळी प्रायोजक मिळविण्याचे एव्हरेस्ट सर करणे अवघड होते. आमच्या संघामध्ये माझ्यासह चारजण टाटा ग्रुपमध्ये काम करणारे होते. टाटा ग्रुपने या मोहिमेसाठी २५ लाख रुपयांचे अर्थसाह्य केले होते. बाकीचे पैसे उभे करून आम्ही ही मोहीम यशस्वी करू शकलो याचा आनंद अपार आहे, असे सुरेंद्र चव्हाण यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी समितीशी संपर्क साधला असता अर्थसाह्य देता येत नसले तरी या मोहिमेला स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा अधिकृत कार्यक्रम म्हणून परवानगी देऊ, असे सांगण्यात आले. त्यामुळे एव्हरेस्ट सर करणाऱ्या स्वप्नांच्या पंखांना गरुडभरारीचे बळ लाभले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silver jubilee of marathi step on everest of risk work happiness ysh
First published on: 18-05-2022 at 01:01 IST