सिमला सफरचंदाचा हंगाम सुरू

शीतगृहातील परदेशी सफरचंदाच्या तुलनेत आरोग्याच्यादृष्टीने हितकारक असलेल्या हिमाचल प्रदेशातील सिमला सफरचंदांचा हंगाम सुरू झाला.

सिमला सफरचंदाचा हंगाम सुरू
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : शीतगृहातील परदेशी सफरचंदाच्या तुलनेत आरोग्याच्यादृष्टीने हितकारक असलेल्या हिमाचल प्रदेशातील सिमला सफरचंदांचा हंगाम सुरू झाला. व्रतवैकल्यांच्या श्रावण महिन्यात सफरचंदाच्या मागणीत वाढ झाली असून किरकोळ बाजारात एक किलो सफरचंदाचे दर १०० ते १२० रुपयांपर्यंत आहेत.  सिमला सफरचंदांचा हंगाम ऑगस्ट महिन्यात सुरू होतो. त्यानंतर लगेचच काश्मीरमधील सफरचंदांचा हंगाम सुरू होतो. सिमला सफरचंदांचा हंगाम ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू असतो. काश्मीरमधील सफरचंदांच्या तुलनेत सिमला सफरचंद टिकाऊ असतात. मार्केट यार्डातील फळबाजारात सिमला सफरचंदांची सहा ते आठ हजार पेटय़ांची आवक होत आहे. एका पेटीत  आकारमानानुसार २५ ते ३० किलो सफरचंद असतात, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील सफरचंद व्यापारी, श्री गुरुदेव दत्त फ्रुट एजन्सीचे शिवजित सुयोग झेंडे यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशातील कुलू, नारकंडा, ढल्ली, लाफू घाटीत सफरचंदांची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. परदेशी सफरचंदाच्या तुलनेत सिमला, काश्मीरमधील सफरचंद चकचकीत नसतात. परदेशी सफरचंदांवर प्रक्रिया केली जात असल्याने ती चकचकीत दिसतात. परदेशी सफरचंदांची साठवणूक शीतगृहात केली जाते. शीतगृहातील सफरचंदांच्या तुलनेत काश्मीर, सिमल्यातील सफरचंद आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असतात, असे त्यांनी नमूद केले.  घाऊक बाजारात सिमला सफरचंदाच्या पेटीचे दर २२०० ते २८०० रुपये आहेत. एका पेटीत २५ ते २८ किलो सफरचंदे असतात. किरकोळ बाजारात एक किलो सफरचंदांचे दर १०० ते १२० रुपयांपर्यंत आहेत.

ग्रेडिंग तंत्रज्ञानाचा वापर

काश्मीर, हिमाचल प्रदेशातील शेतकरी थेट तोड करून सफरचंदे विक्रीस पाठवितात. हिमाचल प्रदेशात सफरचंदाची तोड करण्यासाठी नेपाळी कामगार असतात. करोना संसर्गानंतर हिमाचल प्रदेशात यंत्राद्वारे सफरचंदांचे पॅकिंग (ग्रेडींग) करण्यास सुरुवात केली. यंत्राद्वारे चांगल्या प्रतवारीची सफरचंदे निवडून खोक्यात भरली जातात. काश्मीरमध्ये सफरचंदाची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. एकूण लागवडीत हिमाचल प्रदेशातील सफरचंद लागवडीचा वाटा २० ते २५ टक्के एवढा आहे. 

सिमला सफरचंदांवर कोणतीही प्रक्रिया केली नसते. परदेशी सफरचंदांच्या तुलनेत देशी सफरचंदांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. नैसर्गिकपणे लागवड केलेल्या सफरचंदांना मागणीही चांगली असते. श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात सफरचंदांना मागणी वाढते.

– शिवजित सुयोग झेंडे, सफरचंद व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Simla apple season begins storage health beneficial ysh

Next Story
दूरदर्शनवरील मालिका पाहण्याचे ‘यूजीसी’चे आदेश; ‘ओटीटी’ युगात विद्यार्थ्यांना ‘डीडी’चा आग्रह
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी