पुणे : ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात आणि सातासमुद्रापार सार्वजनिक गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा व्हावा, याउद्देशाने सिंगापूर येथे होणाऱ्या गणेशोत्सवासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीची प्रतिकृती गुरुवारी रवाना करण्यात आली. सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळातर्फे तेथे पाच दिवसांचा गणेशोत्सव होणार असून त्यामध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती सिंगापूरला येत असल्याने तेथील भारतीयांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र मंडळ येथे पाठविण्यात येणाऱ्या गणरायाच्या मूर्तीचे विधीवत पूजन मंदिरात करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मूर्तिकार भालचंद्र देशमुख, राजाभाऊ घोडके उपस्थित होते. सव्वातीन फूट उंचीची ही मूर्ती सुभाषनगरमधील श्री नटराज आर्टचे भालचंद्र देशमुख आणि राजेंद्र देशमुख यांनी महिनाभरात साकारली आहे.

सूर्यवंशी म्हणाले, ‘सिंगापूरमधील मंडळासाठी तीन वर्षांपूर्वी मूर्ती दिलेली होती. मागील वर्षी मंडळाने या मूर्तीचे विसर्जन केले. त्यामुळे सर्व अलंकारांनी सजलेली मूर्ती तेथील गणेशभक्तांसाठी पाठवत आहोत. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ही मूर्ती पाठवत असून यानिमित्ताने संस्कृती व धर्माची पताका सिंगापूरसह संपूर्ण जगभरात उंचावत राहील.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंगापूर महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अजेय कुलकर्णी म्हणाले, ‘सिंगापूरमधील महाराष्ट्र मंडळ यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करणार आहे. १९९४ पासून नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था म्हणून कार्यरत असलेल्या या मंडळाचा उद्देश सिंगापूरमधील महाराष्ट्रीयन समाजात आपुलकी, सौहार्द, एकोपा आणि सांस्कृतिक जाणीवा वाढवणे हा असून, गेल्या तीन दशकांपासून मंडळ महाराष्ट्राची समृद्ध परंपरा विविध उपक्रमांद्वारे सातत्याने जपत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीमुळे सिंगापूरमधील भारतीय समुदायासाठी हा सण अधिक गौरवशाली आणि संस्मरणीय ठरणार आहे. पाच दिवसांच्या उत्सवात धार्मिक पूजा-अर्चा, पारंपरिक ढोल-ताशा आणि लेझीम सादरीकरण, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल.’